सर्वात मोठय़ा संगीत पुरस्कारावर भारताचीही मोहर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय संगीतकार रिकी केज आणि फालू शाह यांनी 64 व्या ग्रॅमी ऍवॉर्ड सोहळय़ामध्ये पुरस्कार जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या दोघांनाही त्यांच्या खास अल्बमसाठी पुरस्कार मिळाले आहेत. याची माहिती खुद्द रिकी केज आणि फालू शाह यांनी दिली सोशल मीडियावरून दिली आहे. पुरस्कारासंबंधीची माहिती देताना केज यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्टीवर्ट कोपलँडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
संगीतातील विशेष आणि सर्वात मोठा पुरस्कार असलेल्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये जगभरातील अनेक संगीतकार आणि गीतकार सहभागी झाले होते. यंदाच्या 64 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळय़ात अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. भारतातर्फे प्रसिद्ध संगीतकार रिकी केज यांनी 64 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. त्यांना हा पुरस्कार न्यू एज अल्बम श्रेणीसाठी मिळाला आहे. संगीतकार स्टीवर्ट कोपलँड यांच्यासह रिकी केजला हा पुरस्कार मिळाला आहे. रिकी केज यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे.
केज यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद ट्विटरवर व्यक्त केला आहे. ‘आज आम्ही आमच्या अल्बम डिव्हाईन टाईड्ससाठी ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. स्टीवर्ट कोपलँड या महान व्यक्तीच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मला कृतज्ञता आणि प्रेम वाटते. हा माझा दुसरा ग्रॅमी आणि स्टीवर्टचा सहावा पुरस्कार आहे. आपले संगीत ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही आहात म्हणून मी आहे’, असे सोशल मीडियावरील रिकी केज यांचे ट्विट व्हायरल होत आहे.
दुसरीकडे, भारतीय संगीतकार फालू शाह यांनीही 64 व्या ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. एवढेच नाही तर अवॉर्ड शोमध्येही त्यांनी आपला परफॉर्मन्स सादर केला. फालू शाह यांना त्यांच्या आ रेहमान या अल्बमसाठी पुरस्कार मिळाला. फालू शाह यांनी 64 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.