प्रतिनिधी / सातारा :
सातारा ते मेढा रस्त्यावर नुने, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या हेरंब बिल्डिंगजवळ दि. 26 रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एकजण ठार झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत अज्ञात वाहन चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तानाजी दौलत इंगळे (वय 33) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास तक्रारदार रिक्षाचालक संतोष पांडुरंग इंगळे (वय 45, रा. इंगळेवाडी, ता. सातारा) हे त्यांचा चुलत भाऊ तानाजी दौलत इंगळे (वय 33), रिक्षा चालकाची आई विमल पांडुरंग इंगळे (वय 65), भाऊ महेश पांडुरंग इंगळे (वय 33 सर्व रा. इंगळेवाडी, ता. सातारा) हे आजारी असल्याने त्यांना रिक्षातून घेवून साताऱ्याकडे निघाले होते.यावेळी नुने गावच्या हद्दीत सातारा ते मेढा रस्त्यावर हेरंब बिल्डिंगजवळ त्यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. समोरुन धडक दिल्याने तानाजी इंगळे हा जागीच ठार झाला तर विमल इंगळे आणि महेश इंगळे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.