संगमेश्वर-घोडवली फाटा येथील अपघात
वार्ताहर/ देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील घोडवली फाटा येथे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात पांगरी धारेखालचीवाडी येथील वृद्ध ठार झाला. यामध्ये गणपत रामा म्हादे (60) हा वृध्द ठार तर रिक्षाचालक संदीप श्रीपत गावडे व दत्ताराम म्हादे हे दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी 8.45 च्या सुमारास घडला.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद रिक्षाचालक संदीप गावडे यांनी दिली. संदीप गावडे हे रिक्षामधून (एमएच 08 4043) पांगरी धारेखालचीवाडी येथील गणपत म्हादे व दत्ताराम म्हादे यांना बुधवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान तुळसणी येथे दवाखान्यात घेवून आले होते. तेथून उपचार घेवून ते पुन्हा पांगरी येथील घराकडे परतत होते. रिक्षा घोडवली फाटा येथे आली असता समोरुन येणाऱया डंपरला साईड देताना रिक्षाचे चाक अचानक खड्डय़ात उतरल्याने रिक्षा उलटली. या अपघातात गणपत म्हादे यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून गणपत म्हादे यांना मृत घोषित केले. या बाबत तपास हेडकॉन्स्टेबल बाणे करीत आहेत.