प्रवासी वाहनांच्या सोबत रांगा
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील एसटी स्टॅड ते प्रशाकीय इमारत या रस्त्यालगत प्रवासी वाहने व रिक्षा चालकांनी रांगा लावल्या आहेत. अरूंद रस्ता आणखी अरूंद झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर परिसरात अतिक्रमण, वाहतूक कोंडी वाढलेली आहे.
कोरोनामुळे रिक्षा व्यवसायिकांवरही संक्रांत आलेली आहे. प्रवासी नसल्याने तासभर वाट पहावी लागत आहे. म्हणून जागा दिसेल तिथे रिक्षा उभी करण्यात येत आहे. अशीच अवस्था एसटी स्टॅड परिसरात पहायला मिळत आहे. एसटी स्टॅड ते प्रशासकीय इमारत या रस्त्यालगत पाच ते दहा रिक्षा रांगा लावून उभ्या आहेत. यांच्यासोबत काळया पिवळया प्रवासी वाहने ही उभी आहेत. यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. याच रस्त्यालगत हात गाडय़ावर खाद्य पदार्थाची विक्री सूरू आहे. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
या परिसरात बांधकाम सुरू असलेल्या शिवाजी संग्रहालयात जम्बो कोविंड सेंटर उभारण्यात आले आहे. रूग्णालयाचा परिसर स्वच्छ असावी, तसेच कोंडी होऊ नये म्हणून येथील हातगाडे व रिक्षा थांबा हटवण्यात आलेला होता. या ठिकाणी अतिक्रम केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र काहीच दिवसात येथे अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. हातगाडे विक्रेते सांडपाणी रस्त्यावर सोडत आहेत. या ठिकाणी कचऱयांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच रिक्षाची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे विक्रेत्यांनी कारवाई थंडावल्याचे म्हणत पुन्हा मनमानी कारभार सूरू केला आहे.