शिवसेनेचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
लॉकडाऊनमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाकडून 1500 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शनिवार( दि.22) पासून परवानाधारक रिक्षाचालकांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेतले जाणार असून यासाठी परिवहन कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे शासनाने आर्थिक दुबल घटकांसाठी अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये मिळणार आहे. अनुदानासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याप्रमाणे 22 मे पासून रिक्षाचालकांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. हे अर्ज भरुन घेण्यासाठी परिवहन कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा, ऍपद्वारे अर्ज विनामूल्य भरुन घ्यावेत, जिल्ह्यात 15287 रिक्षा असून किमान दहा कक्ष उभारावेत, कागदपत्रे नाहीत अशा रिक्षाचालकांचे ऑफलाईन अर्ज भरुन घ्यावेत अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेना अध्यक्ष राजू जाधव, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक देवणे, विजय गायकवाड उपस्थित होते.