क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
चेन्नईन एफसीचा राईट बॅक रिगन सिंगने संघाकडील आपला करार आणखी दोन वर्षांनी वाढविला आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीसाठी खेळणारा 30 वर्षीय रिगन 2020-21 आयएसएल फुटबॉल मोसमात चेन्नईन एफसीसाठी खेळला होता.
रिगन हा एक अनुभवी आणि सीनियर फुटबॉलपटू आहे. त्याच्या कराराने आमच्या बचावफळीत अधिक बळकटी येणार असल्याचे चेन्नईन एफसीच्या सहमालक विता दाणी म्हणाल्या. रिगन सिंगच्या सोबत युवा रहिम अली आणि तामिळनाडूचा एडवीन वंसपॉल यांनी चेन्नईनची करार केला आहे. मणिपूरच्या रिगन सिंगने 2012 मध्ये आपली प्रोफेशनल कारकीर्द शिलाँगच्या रॉयल वाहिंगडोह संघाकडून खेळून केली. तीन वर्षे या क्लबकडून खेळल्यानंतर तो पाच वर्षे आयएसएल फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघासाठी खेळला.
2020 युरो चषक फुटबॉल स्पर्धा खेळलेला फिनलँडचा जोनी कौको 2021-22 आयएसएल फुटबॉल मोसमात कोलकाताच्या एटीके मोहन बागान संघाला खेळणार आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून फिनलँडचा संघ बाद झाला असून त्यानंतर तीनच दिवसांनी कौकोने एटीके मोहन बागानशी करार केला आहे. हा मीडफिल्डर फिनलँडने खेळलेल्या तिन्ही सामन्यांत खेळला आहे. डॅन्मार्कला पराभूत केल्यानंतर फिनलँडला रशिया आणि बेल्जियमकडून पराभूत व्हावे लागले आहे.
30 वर्षीय कौको आपल्या मागील तीन सीझनमध्ये डॅन्मार्कच्या एस्बजर्ग संघाला खेळला आहे. या क्लबसाठी खेळताना त्याने कित्येक गोलही केले आहेत. भारतातील या ऐतिहासिक क्लबशी करार केल्याबद्दल कौकोने आनंद व्यक्त केला आहे.