वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अर्थतज्ञ अजय कुमार यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालकपदी केली आहे. ही नियुक्ती 20 ऑगस्टपासून केल्याचे गृहित धरले जाणार आहे. बँकेने आपल्या अधिकृत वक्तव्यात ही माहिती गुरुवारी दिली. कुमार यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
कुमार यांची ही नियुक्ती पदोन्नतीवर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चलन व्यवस्थापन विभाग, विदेशी चलन विभाग आणि परिसर विभाग यांचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी कुमार यांनी दिल्लीच्या विभागीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून कौशल्याने काम केले आहे. त्यांची ही कार्यक्षमता लक्षात घेऊनच त्यांना नवी महत्वाची जबाबदारी देण्यात आली, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले. कुमार हे गेली 30 वर्षे रिझर्व्ह बँकेच्या सेवेत आहेत. ते पाटणा विद्यापीठाचे अर्थशास्त्रातील मास्टर्स असून बँकिंगचे त्यांनी विशेष शिक्षण घेतले आहे.