9 ऑक्टोबरपर्यंत चालणार : सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पतधोरणाची समीक्षा बैठक 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासंबंधीची माहिती आरबीआयने मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे. बैठकीच्या अंतिम दिनी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देणार आहेत. आजपासून होणाऱया या 3 दिवसीय बैठकीत व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पतधोरण समितीची (एमपीसी) पुढील बैठक 7 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी आरबीआयच पतधोरण समितीच्या 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन प्रतिष्ठित अर्थतज्ञ आशिमा गोयल, जयंत आर. वर्मा आणि शशांक भिडे यांना एमपीसीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नावांना मिळाली मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) या नावांना मंजुरी दिली आहे. आरबीआय अधिनियमानुसार तीन नव्या सदस्यांकडे 4 वर्षाचा कार्यकाळ असेल. नवे सदस्य हे चेतन घाटे, पामी दुआ आणि रविंद ढोलकिया यांची जागा घेणार आहेत. या जुन्या सदस्यांना 29 सप्टेंबर 2016 रोजी 4 वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले होते.
मागील आठवडय़ात होती बैठक
आरबीआयची ही बैठक 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित होती. परंतु ही बैठक आरबीआयने स्थगित केली होती. स्वतंत्र सदस्यांच्या नियुक्तीत विलंब होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती.