नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजस्थानातील युवा काँगेस नेते सचिन पायलट हे लवकरच भाजपमध्ये येतील, असे विधान भाजपच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रिटा बहुगुणा यांनी केले आहे. आपली आणि पायटल यांची फोनवरून चर्चाही झाली असल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, पायलट यांनी हा दावा फेटाळला असून ‘बहुगुणा यांनी बहुतेक सचिन तेंडुलकरशी चर्चा केली असावी, असा टोमणाही त्यांनी मारला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बहुगुणा यांनी सचिन पायलट भाजपमध्ये लवकरच येतील असे विधान केले होते. त्यामुळे काँगेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोनच दिवसांपूर्वी काँगेसचे युवा नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँगेसला धक्का बसला. सचिन पायलटही याच मार्गाने गेल्यास राजस्थानात काँगेसची घसरण होईल, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. गुरुवारी ज्येष्ठ काँगेस नेते आणि प्रसिद्ध विधिज्ञ कपिल सिबल यांनीही काँगेसचे भवितव्य धोक्यात असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला होता.
गेहलोत-पायलट संघर्ष
गेले वर्षभर राजस्थान काँगेसमध्ये दोन तट पडले असून त्यांच्यातील मतभेद जास्त तीव्र होत आहेत. गेल्यावर्षी पायलट यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुरेशी सदस्यसंख्या नसल्याने तो फसला. अखेर त्यांनी काँगेस नेतृत्वाशी जुळवून घेतले. तथापि, अनेकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचित पायलट यांच्या गटांमधील संघर्ष उफाळून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पायलट पुन्हा गेहलोत यांच्या विरोधात सूर लावत असून आपल्या गटाला दिलेली आश्वासने मुख्यमंत्र्यांनी पाळली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
तूर्तास काँगेस त्याग नाही
मात्र, सचिन पायलट यांच्या ताज्या विधानांवरुन ते लवकर काँगेसच्या बाहेर पडतील ही शक्यता नाही, असे तज्ञांचे मत आहे. ते भाजपमध्ये जाणार नाहीत. मात्र आपल्याच पक्षावर दबावतंत्राचा उपयोग करतील. आपल्या गटातील आमदारांना काही मंत्रिपदे दिली जावीत, अशी त्यांची मागणी आहे. याच आश्वासनावर गेल्यावेळचा समझोता झाला होता. पण आता पुन्हा त्यांच्या गटाने डोके वर काढल्याने राजस्थानात अस्थिरत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.