प्रतिनिधी/ सातारा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा कामगार युनियनचे अध्यक्ष शरद गायकवाड (वय वर्षे 43) यांचे सोमवारी रात्री पुणे येथे अल्पशा अजाराने निधन झाले. माहुली येथील वैकुंठ स्मशानभूमीत काल त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंकार करण्यात आले. शरद गायकवाड यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने रिपब्लिकन चळवळीसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
वयाच्या 20 व्या वर्षापासून शरद गायकवाड चळवळीत सक्रिय कार्यरत होते. त्यांच्या या आक्रमक वृत्तीची दखल घेत बहुजन समाज पक्षाने त्यांना स्वतःच्या पक्षात सामील करून घेतले. यथावकाश त्यांनी राजगृह संस्था स्थापन करून त्यामाध्यमातून विविध उपक्रमही राबवले. शहर आणि परिसरात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. कालांतराने रामदास आठवले यांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिह्याचे नेते अशोकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. शरद गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त समजतात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी सामाजिक न्यायमंत्री अविनाश महातेकर यांनी दुःख व्यक्त केले. जेष्ठ साहित्यिक पार्थ पोळके, अशोक गायकवाड, लेखक अरुण जावळे, बाळासाहेब शिरसट, चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब ओव्हाळ, अमोल आवळे, सुशीलकुमार कांबळे, ऍड. दयानंद माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी गायकवाड यांना श्रध्दांजली अर्पण केली.