वार्ताहर / राजापूर
सुविधांच्या बाबतीत सरकारी मदतीवर अवलंबून असलेले राजापूर शहर आणि तालुक्याच्या भवितव्याचा विचार करून नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन समर्थन दर्शवणाऱया नगरसेवकांचे रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड.शशिकांत सूतार यांनी खास अभिनंदन केले आहे.
नगर परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील नगरसेवकांपैकी नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांच्यासह उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, आसिफ मुजावर, परवीन बारगीर, राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले, भाजपाचे नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा अशी सकारात्मक भूमिका घेतली होती.
या पार्श्वभूमीवर बोलताना ऍड.सूतार यांनी राजापूर नगर परिषद हे केवळ राजकारणाचेच केंद्र आहे अशी भावना नागरीकांमध्ये निर्माण झालेली आहे. मात्र शहरातील ज्या लोकप्रतिनिधींनी व्यापक विचार करून दाराशी आलेल्या या प्रकल्पातून शहर आणि तालुक्याच्या सकारात्मक भवितव्याची आशा बाळगली आहे ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरासह तालुक्याच्या विकासाच्या चळवळीला सहकार्य करणाऱया या नगरसेवकांच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा या लढाईत निश्चितच विजय मिळवू असा विश्वास ऍड.सूतार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.