काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपासह सेनेच्या 2 नगरसेवकांचे समर्थन
वार्ताहर / राजापूर
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, यासाठी सर्व स्तरातून आवाज उठवला जात असताना आता राजापूर नगर परिषदेनेही रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत तसा ठराव पारित केला आहे. मंगळवारी झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजपा नगरसेवक व शिवसेनेच्या 2 नगरसेविकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने 11 विरूध्द 5 मतांनी हा ठराव पारित झाला. राजापूर नगर परिषदेतील लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राजापूर नगर परिषदेची सभा मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने झाली. सभेत आयत्यावेळच्या विषयात नगराध्यक्ष ऍड. खलिफे यांनी रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा प्रस्ताव मांडला. यावर काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी ठरावाला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादीचे संजय ओगले, भाजपाचे गोविंद चव्हाण यांनी पाठिंबा दर्शवला. शिवसेनेचे गटनेते विनय गुरव यांनी या ठरावाला विरोध करत या प्रकल्पाबाबत पक्षाची आहे तीच भूमिका आपली असल्याचे नमूद केले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. यावेळी गुरव यांच्यासह ऑनलाईन उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या 5 सदस्यांनी ठरावाविरोधात मतदान केले. मात्र शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी रिफायनरी प्रकल्प ठरावाला समर्थन असल्याचे सांगितले. कनेक्टीव्हीटी नसल्याने मनीषा मराठे यांनी मोबाईलवर संपर्क साधून आपले समर्थन असल्याचे सांगितल्याचे नगराध्यक्ष ऍड. खलिफे यांनी सांगितले. त्यामुळे 11 विरूध्द 5 मतांनी हा समर्थनाचा ठराव मंजूर झाल्याचे नगराध्यक्ष ऍड. खलिफे यांनी जाहीर केले.
नगराध्यक्षांनी नगरसेवकांचे मानले आभार
हा प्रकल्प झाला तर राजापूर शहरासह ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा निर्माण होईलच, पण तरुणांना रोजगार मिळेल. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाला गती मिळेल. त्यामुळे राजापूर नगर परिषदेच्यावतीने या प्रकल्पाचे आम्ही समर्थन करत असल्याचे ऍड. खलिफे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सहकारी नगरसेवकांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी या प्रकल्पाचे समर्थन करत ठरावाला पाठिंबा दिल्याबद्दल नगराध्यक्ष ऍड. खलिफे यांनी आभार व्यक्त केले. या ठरावाच्या प्रती शासनाबरोबरच जिल्हाधिकारी व रिफायनरी कंपनीला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..