कुटुंबाची काळजी घेता घेता महिलांचं स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तरुण वय सरू लगल्यावर चेहर्यावर वार्ध्यक्याच्या खुणा दिसू लागतात. उत्साह कमी होतो. संसारात गुरफटून गेलेल्या महिला आता काय करायचंय नटून असं म्हणत अनेक गोष्टी टाळतात. मग वजनही वाढू लागतं. पण मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी असाल तरच संपूर्ण कुटुंब आनंदी राहील हे कायम लक्षात ठेवा. स्वतःच्या दिनचर्येत थोडेफार बदल करा. यामुळे तुम्ही आनंदी रहाल आणि इतरांनाही आनंदी ठेवाल.
- कंटाळवाण्या आणि निरस आयुष्यात काहीतरी बदला. आठवडय़ातून एकदा जेवणानंतर थोडं फिरायला जा. जवळच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खा. एखाद्या निवांत दुपारी कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी प्या. नव्या लोकांशी ओळखी करून घ्या. रूटिन आयुष्यातून थोडा ब्रेक घ्या.
- नव्या आयुष्याची सुरूवात मोठय़ा उत्साहाने केली जाते. मात्र कालांतराने आपण पुन्हा जुन्या आयुष्याकडे वळतो. तुम्ही अशा क्षणांसाठी तयार रहायला हवं. इतकंच नाही तर तुमचा निर्धार पक्का असायला हवा. तुमच्या उद्दिष्टांमध्ये कोणतीही बाधा येऊ नये.
- स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. चिंता, ताणतणाव आपल्या आयुष्यात असणारच. मात्र हे सगळं दूर सारून सकारात्मक विचार मनात आणा. आवडत्या गोष्टी करा. छंद जोपासा. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल.
- आपण आपल्या आयुष्यात बदल घडवत असल्याचं कोणालाही सांगू नका. बरीच माणसं आपल्या उत्साहावर पाणी फेरण्याचं काम करतात. अशा लोकांपासून लांब रहा.
- स्वतःच्या आनंदासाठी स्वतः प्रयत्न करा. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून आनंद शोधत रहा. नव्या गोष्टी शिकत रहा.