प्रतिनिधी /मडगाव
आर्थिक मंदीतून कसे-बसे सावरत असतानाच रियल इस्टेटवाल्यांना फटका बसलाय तो कोरोना व्हायरसचा. सध्या लॉकडाऊनमुळे गेला महिनाभर सर्व कामे ठप्प झाली आहेत. रियल इस्टेटमध्ये म्हणा किंवा बांधकाम क्षेत्रातील काही कामे ही पावसाळय़ापूर्वी पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी सरकारने रियल इस्टेटसाठी लॉकडाऊनमधून थोडी शिथिलता द्यावी, अशी मागणी मडगावचे बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई यांनी केली आहे.
बांधकाम क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे पूर्ण होणे खुपच महत्वाचे असते. त्यासाठी थोडी शिथिलता मिळाली तर ही कामे पूर्ण करून घेणे शक्य होईल. आज अनेक बिल्डरांनी आपले कामगार पुन्हा गावी पाठवून दिलेले नाहीत. ते बांधकाम साईटवर सुरक्षित आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था ही बिल्डर स्वतःहून करतात. जर थोडी शिथिलता दिली तर याच कामगारांना पुन्हा काम मिळेल तसेच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास मदत होईल, असे मत डॉ. प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन पाळला, याला बांधकाम क्षेत्रातील लोकांनी पूर्ण सहकार्य केले आहे. लॉकडाऊनमुळे गेला महिना भर सर्व कामे बंद असल्याने बिल्डरांचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. सरकारने सर्व काळजी घेऊन रियल इस्टेटवाल्याचा कुठे तरी विचार करावा आणि रियल इस्टेट इंडस्ट्रीजला चालना देण्यासाठी स्टेम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन फी यासाठी थोडी सूट द्यावी तरच रियल इस्टेटला ग्राहक भेटतील अन्यथा मार्केट पुन्हा कोसळण्याची शक्यता देखील प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक मंदीतून कुठे तरी डोके वर काढत असतानाच कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगालाच फटका बसलेला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम झालेला आहे. आत्ता सर्व काही ठिकाणावर येण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जर सरकारने रियल इस्टेटसाठी प्रोत्साहन दिले तर खरेदी-विक्री व्यवहार पुन्हा सुरू होण्यास मदत होईल असे डॉ. प्रभुदेसाई म्हणाले.
‘रेरा’च्या चौकटीत राहून सद्या बिल्डरांना प्रकल्प पुढे न्यावे लागतात. एखाद्या प्रकल्प हातात घेतल्यानंतर तो ठराविक काळात पूर्ण करावा लागतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प झाल्याने प्रकल्प वेळीच पूर्ण करणे शक्य होणार नसल्याची कल्पना ‘रेरा’ला देण्यात आल्याची माहिती डॉ. प्रभुदेसाई यांनी दिली. सरकारने आज अनेक उद्योगांना लॉकडाऊनच्या काळात सहकार्य केले आहे. त्याच पद्धतीने सरकारने रियल इस्टेटला देखील सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोव्यात कोरोना व्हायरस संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गोव्यात इतर राज्यांची तुलना केल्यास परिस्थिती खुपच चांगली आहे. आत्ता थोडी बंधने घालून कामकाज सुरू होत आहे. तशीच बंधने घालून रियल इस्टेटला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. देश प्रभुदेसाई