वृत्तसंस्था// कल्याणी
येथे सुरू असलेल्या आयएफए शिल्ड फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात विद्यमान विजेत्या रियल काश्मीर एफसी संघाने गोकुळम केरळ एफसी संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
124 व्या आयएफए शिल्ड फुटबॉल स्पर्धेत आता बुधवारी रियल काश्मीर एफसी आणि श्रीनिधी डेक्कन एफसी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात श्रीनिधी डेक्कन एफसीने रेल्वे एफसी संघाचा जादावेळेच्या कालावधीत 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. डेव्हिड रॉबर्टसनच्या मार्गदर्शनाखाली रियल काश्मीर एफसी संघाने या उपांत्य सामन्यात 23 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. मॅसन ली रॉबर्टसनने हेडरद्वारे रियल काश्मीर एफसीचा गोल नोंदविला. 21 व्या मिनिटाला रियल काश्मीर एफसीचा दुसरा गोल थोई सिंगने नोंदविला. थोई सिंगने शहनवाज बशीरच्या पासवर मिळालेल्या कॉर्नरवर रियल काश्मीर एफसीचा दुसरा गोल केला. या सामन्यात शहनवाज बशीरला ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले. गोकुळम केरळ एफसीचा एकमेव गोल 48 व्या मिनिटाला रॉबिन सिंगने नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत रियल काश्मीर एफसीने गोकुळम केरळवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील 42 व्या मिनिटाला मॅसनने मारलेला हेडरवरील फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने रियल काश्मीर एफसीचा तिसरा गोल हुकला.