वृत्तसंस्था / माद्रिद
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या आर्थिक अरिष्टावर मात करण्यासाठी, त्यावर मार्ग काढण्यास व्यवस्थापनासह सहकार्य करण्यासाठी रियल माद्रिदच्या खेळाडू व सहायक पथकातील सदस्यांनी या हंगामात 10 ते 20 टक्के वेतन कपात स्वीकारण्याची स्वतःहून तयारी दर्शवली आहे. संघव्यवस्थापनाने एका पत्रकाद्वारे याची माहिती दिली.
2019-20 हंगामाची सांगता झाल्यानंतर त्यावेळी जी परिस्थिती असेल, त्यानुसार, किती वेतन कपात होईल, हे अवलंबून असेल, असे रियल माद्रिदच्या संचालकांनी यावेळी नमूद केले.
रियल माद्रिद संघाचा कर्णधार सर्जिओ रामोस व संघ संचालक यांच्यात याबाबत चर्चा झाली आणि त्यात वेतन कपात किती असावी, यावर भर देण्यात आला. क्लबच्या अन्य कर्मचाऱयांची वेतन कपात होऊ नये, यावर आपण प्रयत्नशील असल्याचे व्यवस्थापनाने याप्रसंगी सांगितले.
कोव्हिड-19 प्रकोपाचा स्पेनला मोठा फटका बसला असून आतापर्यंत या साथीमुळे 14555 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. ला लिगाचा फुटबॉल हंगाम सध्या अनिश्चित कालावधीसाठी निलंबित केला गेला असून पुन्हा हंगामाला केव्हा सुरुवात होईल, याबाबत काहीही स्पष्टता नाही.
खेळाडू, प्रशिक्षक,
कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात
आले.
रियल माद्रिदपूर्वी बार्सिलोना व ऍटलेटिको माद्रिद यांच्या खेळाडूंनी देखील नेहमीपेक्षा कमी वेतन स्वीकारण्यास आपण राजी असल्याचे कळवले असून त्याचे अनुकरण अन्य क्लब संघांनी करावे, असे आवाहन यापूर्वी ला लिगाने केले आहे.