40 टक्के हिस्सा खरेदी – भारतासह विविध देशात व्यवसाय विस्ताराची संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स ब्रँडस लिमिटेडने फॅशन डिझाइनर मनिष मल्होत्रा यांच्या एमएम स्टाइल्स लिमिटेडमधील 40 टक्के हिस्सा खरेदी करण्याचे ठरवले असल्याचे समजते.
हिस्सा खरेदीविषयी उभयतात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असून यासंबंधातला करार पार पडला आहे. यानुसार रिलायन्स ब्रँडस् एमएममधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. खासगीरित्या चालवण्यात येणाऱया फॅशन ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्याचा हा पहिला व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. सदरची धोरणात्मक भागीदारी ही उभयतांसाठी दीर्घकाळासाठी व्यवसाय देशात आणि देशाबाहेर वाढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
भागीदारी ठरणार लाभदायक -इशा अंबानी
रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या संचालिका इशा अंबानी यांनी, सदरची धोरणात्मक भागीदारी ही महत्त्वाचीच आहे. मनिष मल्होत्रा यांच्या कल्पक डिझाइन्सना खूप मोठा प्रतिसाद लाभतो आहे. देशासह इतर देशातही त्यांच्या डिझाइन्सना पसंती आहे. भविष्याचा वेध घेत आपली डिझाइन्स साकारण्यात मनिष यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे या भागीदारीचा लाभ भविष्यात उत्तमपणे होईल अशी आशा असल्याचे इशा अंबानी यांनी म्हटले आहे.