393 कोटी रुपयांना खरेदी व्यवहार झाल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील लोकप्रिय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच आपला आणखी एक करार पूर्ण केला असून या अंतर्गत कंपनीने स्ट्रँड लाईफ सायन्सेस या कंपनीचे अधिग्रहण केले असल्याचे सांगितले जात आहे. हा आणखी एक महत्त्वाचा खरेदी करार म्हटला जात आहे.
सदरची हिस्सेदारी ही कंपनीने 393 कोटी रुपयांना खरेदी केल्याचेही सांगितले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासंबंधीची माहिती शेअर बाजाराला काही दिवसांपूर्वी दिली आहे. रिलायन्सची सहकारी कंपनी रिलायन्स स्ट्रटेजिक बिझनेस वेंचर्स लिमिटेड याअंतर्गत सदरचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. याअंतर्गत स्ट्रँड लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे 10 रुपयाचे 2 कोटी 28 लाख इक्वीटी समभाग कंपनीने 393 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे समजते. मार्च 2023 पर्यंत 160 कोटी रुपयांची आणखी अतिरीक्त गुंतवणूकही होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. स्ट्रँड लाइफ सायन्सेस ही कंपनी 2020 मध्ये भारतामध्ये अस्तित्वात आली आहे. जैव माहिती आणि विज्ञान सॉफ्टवेअर क्षेत्रात कंपनी काम करते. सदरच्या कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 88.70 कोटींचा व्यवसाय केला आहे.