रिलायन्सची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा : रिटेलला अच्छे दिन, स्वस्त स्मार्टफोन
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणाऱया रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची 44 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) गुरुवारी पार पडली. व्हर्चुअल स्वरुपात या प्रकारची बैठक होण्याची ही दुसरी वेळ राहिली आहे. मागील वर्षात जवळपास 41 देशातील 461 शहरांमधील 3 लाखहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. यावेळेलाही 3 लाखाहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे.
सदरच्या बैठकीत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलबाबत अनेक घोषणा केल्या. पुढील 3 वर्षाच्या काळात 1 कोटी नव्या किराणा भागीदारांना सामील केले जाणार असून रिलायन्स रिटेलकडे 10 लाख कर्मचारी असतील, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या लाटेतही जियोची कामगिरी सरस राहिल्याचा उल्लेख अंबानी यांनी बैठकीत करत देशात सर्वाधिक 40 कोटीहून अधिक ग्राहक असल्याचे सांगितले. सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यासोबत मुंबईत जियो इन्स्टिटय़ूटची स्थापना करण्यासह विविध संभाव्य योजनांची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
‘जिओफोन नेक्स्ट’चे सादरीकरण
मागील काही दिवसांपासून चर्चेत राहिलेला गुगलसोबत मिळून सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘जिओफोन नेक्स्ट’ या मॉडेलचे सादरीकरण गुरुवारी कंपनीच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आले आहे. या फोनची विक्री 10 सप्टेंबरपासून करण्यात येणार असून हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे.
बैठकीमधील ठळक मुद्दे
- रिलायन्सने मागील वर्षात 75000 लोकांना रोजगार दिला
- मागील आर्थिक वर्षात 3.24 लाख कोटीची उभारणी
- देशाच्या एकूण निर्यातीत रिलायन्सचा 6.8 टक्के हिस्सा
- रिलायन्सच्या संचालक मंडळात सौदी अराम्कोच्या अध्यक्षाचा समावेश
- जिओची ग्राहक संख्या 42.5 कोटीच्या घरात
- कंपनीला 15 वर्षात कार्बनमुक्त करण्याचे ध्येय
- रिलायन्स रिन्यूएबल एनर्जीमध्ये 60,000 कोटी गुंतविणार
- सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रीत
- रिलायन्स इंडस्ट्रीजला वेळेच्या अगोदरच केले कर्जमुक्त
- वीज व्यवसायात 3 वर्षात 75000 कोटी गुंतवण्याचे संकेत