सलगच्या विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव : इंडसइंड बँक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि कोटक महिंद्राच्या कामगिरीने सेन्सेक्स तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये मागील काही दिवसांपासून सलगपणे सुरु असणाऱया विदेशी गुंतवणुकीचाही प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 230 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. शेअर बाजारातील ही सलगची चौथी तेजी नोंदवण्यात आली आहे. बीएसईमधील प्रमुख समभागांच्या तेजीमुळे सेन्सेक्स 230.4 अंकांनी वधारुन निर्देशांक 39,073.92 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 77.35 अंकांची तेजी नोंदवत 11,549.60 वर स्थिरावला आहे.
चालू महिन्याच्या अंतिम दिवसांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांच्यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या समभाग खरेदीमुळे निर्देशांकाला मोठी झेप घेण्यास मदत झाली आहे. या प्रवासात जागतिक शेअर बाजाराचे सकारात्मक संकेत आणि सलगची होत असणारी विदेशी गुंतवणूक यामुळे बाजाराला तेजी कायम टिकवण्यात यश मिळाले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्मयांनी तेजीत राहिले होते. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक, कोटक बँक, बजाज ऑटो आणि एचसीएल टेक यांचा समावेश राहिला आहे. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी आणि एशियन पेन्ट्सचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारांनी आज मिश्र प्रतिसाद दिलाय. जागतिक बाजारामध्ये हाँगकाँगचा हँगसेंन आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नफ्यात राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कंपोजिट आणि जपानचा निक्की घसरणीत राहिला आहे. युरोपमधील फ्रान्स आणि जर्मनीचा शेअरबाजार प्रारंभीमध्ये तेजीत राहिले होते. परंतु लंडनचा शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे.