जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण – निफ्टी 17,800 वर
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ाच्या तुलनेत चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात ही मजबूत झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये चालू आठवडय़ाच्या दुसऱया सत्रात मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कंसल्टन्सी आणि इन्फोसिस यांच्या समभागाच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने 446 अंकांचा टप्पा प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीचा फायदा सेन्सेक्सला झाला आहे.
बीएसईमधील 30 समभागांत नकारात्मक कल प्राप्त करत सुरुवात झालेल्या सेन्सेक्स निर्देशांकाने मात्र दिवसअखेर 445.56 अंकांनी वधारुन 59,744.88 वर बंद होण्यात यश मिळवलं आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 131.05 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,822.30 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबत भारती एअरटेल, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि एशियन पेन्ट्सचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला सन फार्मा, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
जागतिक बाजारात मिळताजुळता कल राहिला व यादरम्यान कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकालही जाहीर होत असल्याने त्याचा प्रभाव बाजारावर सकारात्मक दिसत आहे. याचा लाभ हा देशातील गुंतवणूकदारांनी घेतल्याने बाजाराला आपला तेजीचा प्रवास सकारात्मक मार्गावर राहिल्याचे दिसून आले असून हे चित्र येत्या काळातही राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
मुख्य क्षेत्रांचा प्रभाव
माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा कंपन्यांचे समभाग लाभात राहिले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका नुकसानीत होत्या.