सुरेश केपेकर यांचा दणदणीत विजय
प्रतिनिधी/ सांगे
प्रतिष्ठेच्या आणि चुरसपूर्ण लढतीत जिल्हा पंचायतीच्या रिवण मतदारसंघात भाजपने आपली विजयाची परंपरा राखून ठेवली आहे. भाजपचे युवा उमेदवार सुरेश दत्ता केपेकर यांनी दणदणीत विजय संपादन केला असून प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अभिजित देसाई यांचा 2373 मतांच्या फरकाने पराभव केला. तर सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्याकडून पुरस्कृत अपक्ष उमेदवार गजानंद रायकर यांना तिसऱया स्थानावर राहावे लागले. या निकालातून माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविले आहे.
या निवडणुकीत मतदारांनी भाजपला पसंती दिली. अगदी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून भाजपच्या केपेकर यांनी आघाडी मिळविण्यास सुरुवात केली होती, ती शेवटपर्यंत कायम राहिली. माजी आमदार फळदेसाई यांनी पूर्ण ताकद केपेकर यांच्या बाजूने लावली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रति÷sची बनली होती. तर दुसऱया बाजूने अपक्ष आमदार गावकर यांनी आपले समर्थक रायकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले होते. पण त्यांना यश संपादन करता आले नाही. विधानसभा निवडणुकीच्या या उपांत्य फेरीत भाजपने मुसंडी मारली आहे.
प्रारंभीच भाजपाला मिळालेली आघाडी कायम
सकाळी 8 वा. सांगे क्रीडा संकुलामध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ झाला. एकूण चार टप्यांत मतमोजणी पार पडली. सुरुवातीलाच केपेकर यांनी 632 मतांची आघाडी घेतली. तो आलेख चढत राहिला. भाजपचे विजयी उमेदवार सुरेश केपेकर यांना 5416 तर काँग्रेसच्या अभिजित देसाई यांना 3043 मते प्राप्त झाली. त्यापाठोपाठ अपक्ष गजानंद रायकर यांना 2481, आपच्या संदीप नाईक यांना 325, मगोचे रूपेश गावकर यांना 324, अपक्ष सुधाकर गावकर यांना 111 व अपक्ष जुजिनो डिकॉस्ता यांना 81 मते प्राप्त झाली. 12026 मतांपैकी 245 मते बाद ठरली.
फळदेसाई, कार्यकर्ते, मतदारांना श्रेय : केपेकर
सतत चौथ्यांदा भाजपने रिवण जिल्हा पंचायत मतदारसंघात कमळ फुलविले आहे. केपेकर यांनी विजय प्राप्त केल्यावर भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी एकच जल्लोष केला. आपल्या या विजयाचे श्रेय केपेकर यांनी सुभाष फळदेसाई, कार्यकर्ते व तमाम मतदारांना दिले आहे. मतदारांनी भाजप व आपल्यावर जो विश्वास दाखविलेला आहे तो आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कार्यकर्त्यांनी जो अंदाज वर्तविला होता तो प्रत्यक्षात उतरल्याने ते म्हणाले.
मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तोड नाही : फळदेसाई
माजी आमदार फळदेसाई यांनी मतदारांचे आभार मानताना जो विश्वास भाजप उमेदवारावर दाखविला गेला आहे त्याला तोड नाही, असे सांगितले. यावेळी माजी आमदार वासुदेव गावकर हजर होते. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक मोठय़ा संख्येने हजर होते. विजयानंतर केपेकर यांनी फळदेसाई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मतदारसंघात मिरवणूक काढली. आमदार गावकर हेही मतमोजणी केंद्रावर सकाळपासून हजर होते. मतदारांचा निर्णय हा श्रे÷ आहे, असे ते म्हणाले.
निर्वाचन अधिकारी म्हणून सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी आपल्या पथकासह मतमोजणी प्रक्रिया हाताळली. तर पोलीस उपअधीक्षक किरण पौडवाल, सांगेचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.