रिव्हर्स स्विंगचा बादशाह जेम्स अँडरसनचे अवघ्या 17 धावात 3 बळी, पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणकेबाज विजय
चेन्नई / वृत्तसंस्था
जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक रिव्हर्स स्विंगच्या स्पेलमुळे यजमान भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत 227 धावांनी अक्षरशः धुव्वा उडाला आणि ब्रिस्बेन, सिडनीतील पराक्रमाची पुनरावृत्ती होणार, या भारतीयांच्या अपेक्षांचा अगदी चक्काचूर झाला. विजयासाठी 420 धावांचे आव्हान असताना चेपॉकच्या खेळपट्टीवर भारताची 58.1 षटकात अवघ्या 192 धावांमध्येच दाणादाण उडाली. जेम्स अँडरसनने 17 धावांमध्येच 3 बळी घेत भारताच्या मध्यफळीला सुरुंग लावला आणि यातून संघाला अखेरपर्यंत सावरता आले नाही. इंग्लंडने या विजयासह 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
अँडरसनने शुभमन गिल (50), अजिंक्य रहाणे (0) व ऋषभ पंत (11) हे तीन महत्त्वाचे मोहरे गारद करत इंग्लंडच्या मार्गातील मोठे अडसर दूर केले आणि ब्रिस्बेन, सिडनीसारखे पराक्रम गाजवले जाणार नाहीत, याचीही तजवीज केली. कर्णधार विराट कोहलीने (104 चेंडूत 72) फलंदाजीला कष्टप्रद खेळपट्टीवर ठाण मांडत आपल्या सहकाऱयांसमोर आदर्श ठेवला. पण, त्याच्या एकाही सहकाऱयाने अपेक्षित साथ दिलीच नाही.
विराटने स्विंग व फिरकी गोलंदाजीचा तितक्याच ताकदीने समाचार घेतला. अर्थात, एका बाजूने सहकारी फलंदाज बाद होत राहिल्याने त्याच्या प्रयत्नांवर प्रचंड मर्यादा राहिल्या. अष्टपैलू बेन स्टोक्सने विराटची यष्टी वाकवली आणि भारताच्या सर्व आशाअपेक्षा संपुष्टात आल्या. अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे या सर्व सामन्याचा नूर बदलून गेला. पहिल्या डावात धडाकेबाज द्विशतक झळकावणारा इंग्लिश कर्णधार जो रुट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
लीचची सर्वोत्तम गोलंदाजी
डावखुरा फिरकीपटू जॅक लीचने (26-4-76-4) आपली सर्वोत्तम गोलंदाजी साकारली. शिवाय, पहिल्या डावातील महागडय़ा गोलंदाजीची पुरेपूर भरपाई केली. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनची गोलंदाजी हमखास बहरते, याचा प्रत्यय येथे आणखी एकदा आला. भारतीय संघातर्फे इशांतने रिव्हर्स स्विंग उत्तम साकारले. पण, त्यापेक्षा अँडरसन अधिक सरस व अधिक भेदक ठरला.
भारताच्या डावात शुभमन गिल (83 चेंडूत 50) आणखी एकदा आश्वासक फलंदाजी करण्यात यशस्वी ठरला. 7 चौकार व 1 षटकार फटकावताना त्याने फिरकी गोलंदाजीचाही उत्तम सामना केला. अगदी चेतेश्वर पुजारा (38 चेंडूत 15) बाद झाल्यानंतरही गिलच्या फलंदाजीवर याचा कोणताही विपरीत परिणाम दिसून आला नाही. पुढे 27 व्या षटकात अँडरसन नव्या चेंडूसह गोलंदाजीस आला आणि एका अप्रतिम रिव्हर्स इनस्विंगरवर त्याने गिलचा ऑफस्टम्प उडवत मोठा अडसर दूर केला.
रहाणे, पंतची निराशा
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱया अजिंक्य रहाणे व ऋषभ पंतने येथे निर्णायक क्षणी निराशा केली, त्याचाही भारताला फटका बसला. अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर पायचीत होता होता बचावला आणि त्याचे फूटवर्क अपेक्षितरित्या होत नसल्याचे अँडरसनने अचूकपणे ताडले. आपल्या तिसऱयाच चेंडूवर रहाणे जिम्मीच्या आणखी एका अप्रतिम इनस्विंगरवर त्रिफळाचीत झाला. पंतने (11) यापूर्वी 3 उत्तम डाव साकारले होते. पण, इथे अँडरसनसारखा अनुभवी व बहरातील गोलंदाज त्याच्यासमोर होता, इतकाच फरक सामन्यातील जेता ठरवून गेला. पंत ड्राईव्ह करण्याच्या घाईत असेल, याचा अंदाज असणाऱया अँडरसनने स्लोअर वनचे जाळे रचले आणि पंत त्यात अलगद अडकला.
फलंदाजीतील या हाराकिरीमुळे भारतीय संघाची 2 बाद 92 वरुन 5 बाद 110 अशी वाताहत झाली आणि त्यानंतर सर्व भिस्त विराटवर होती. विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ जरुर साकारला. पण, विश्वविक्रमी आव्हान समोर असताना सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने याचा संघाला फटका सोसावा लागला. वॉशिंग्टन सुंदरला खाते उघडण्यापूर्वीच बेसने बाद केले तर बुमराह आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव 192 धावांमध्येच उखडला गेला आणि इंग्लंडच्या धडाकेबाज विजयावर शिक्कामोर्तब झाले.
आता जूनमध्ये होणाऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारायची असेल तर भारताला उर्वरित 3 पैकी 2 कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 578
भारत पहिला डाव ः सर्वबाद 337
इंग्लंड दुसरा डाव ः सर्वबाद 178.
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा त्रि. गो. लीच 12 (20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल त्रि. गो. अँडरसन 50 (83 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा झे. स्टोक्स, गो. लीच 15 (38 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली त्रि. गो. स्टोक्स 72 (104 चेंडूत 9 चौकार), अजिंक्य रहाणे त्रि. गो. अँडरसन 0 (3 चेंडू), ऋषभ पंत झे. रुट, गो. अँडरसन 11 (19 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन सुंदर झे. बटलर, गो. बेस 0 (5 चेंडू), रविचंद्रन अश्विन झे. बटलर, गो. लीच 9 (46 चेंडूत 1 चौकार), शाहबाज नदीम झे. बर्न्स, गो. लीच 0 (13 चेंडू), इशांत शर्मा नाबाद 5 (15 चेंडूत 1 चौकार), जसप्रित बुमराह झे. बटलर, गो. आर्चर 4 (4 चेंडूत 1 चौकार). अवांतर 14. एकूण 58.1 षटकात सर्वबाद 192.
गडी बाद होण्याचा क्रम
1-25 (रोहित, 5.3), 2-58 (पुजारा, 19.3), 3-92 (शुभमन, 26.2), 4-92 (अजिंक्य, 26.5), 5-110 (ऋषभ पंत, 32.3), 6-117 (वॉशिंग्टन, 33.5), 7-171 (अश्विन, 51.2), 8-179 (विराट, 54.3), 9-179 (नदीम, 55.3), 10-192 (बुमराह, 58.1).
गोलंदाजी
जोफ्रा आर्चर 9.1-4-23-1, जॅक लीच 26-4-76-4, जेम्स अँडरसन 11-4-17-3, डॉम बेस 8-0-50-1, बेन स्टोक्स 4-1-13-1.
जेम्स अँडरसन व रिव्हर्स स्विंग…!
38 वर्षे व 194 दिवस वय असणाऱया अँडरसनने झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले, त्यावेळी शुभमन गिल प्ले-स्कूलमध्ये तर ऋषभ पंत नर्सरीत होते. अर्थात, याला 18 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही अँडरसनच्या स्विंगमधील जादू कायम आहे, हे आणखी एकदा दिसून आले. वासिम अक्रम लँकेशायरमध्ये सराव करायचा, त्यावेळी अँडरसनने सुलतान ऑफ स्विंगच्या गोलंदाजीतील सर्व अस्त्रs, वैविध्याचे बारीक निरीक्षण केले होते. मंगळवारी त्याने जो भेदक मारा साकारला, त्याने रिव्हर्स स्विंगवर हुकूमत असणारे सर्वच गोलंदाज सुखावलेले असणार आहेत.
उभय संघातील दुसरी कसोटी शनिवारपासून चेन्नईतच होईल.
कोहली, अश्विन एसजी चेंडूच्या दर्जावर नाराज
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वापरल्या गेलेल्या एसजी कसोटी चेंडूच्या दर्जावर भारतीय कर्णधार विराट कोहली व अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. 60 व्या षटकादरम्यान शिवण उसवल्यानंतर हे चेंडू पूर्ण नरम होत गेले. भारतीय खेळाडूंनी याबाबत मैदानी पंचांकडे तक्रारही केली. पण, नितीन मेनन व अनिल चौधरी यांनी चेंडू बदलण्याच्या त्यांच्या विनंतीकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. या मालिकेकरिता मीरतमधील सॅन्सेरेल्स ग्रीनलँडस् (एसजी) यांनी नवे चेंडू तयार केले आहेत. मागील कित्येक वर्षात आपण इतका खराब चेंडू पाहिलेला नाही, असे कोहली व अश्विन एकमताने म्हणाले.