वृद्धिमान साहा व गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, अभिमन्यू ईश्वरनही आयसोलेशनमध्ये
वृत्तसंस्था /नवी दिल्ली / लंडन
इंग्लंड दौऱयावर असणाऱया भारतीय क्रिकेट संघातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून अन्य दोन सदस्यांना सावधगिरीसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत व थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी हे कोव्हिड 19 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोचिंग स्टाफमधील गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, राखीव यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन हे दयानंद गरानी यांच्या संपर्कात आले असल्याने त्यांना सावधगिरी म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हे पाचही सदस्य सध्या लंडनमध्ये असून अन्य सर्व खेळाडू 20 दिवसांच्या ब्रेकनंतर गुरुवारी सायंकाळी डरहॅममध्ये दाखल झाले आहेत. 20 जुलै रोजी भारताचा संयुक्त कौंटी संघाविरुद्ध सराव सामना होणार असून साहा व पंत यांना हा सामना हुकणार आहे. पंत हा गेल्या आठ दिवसांपासून आयसोलेशनमध्ये असल्याचे व त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले. ‘8 जुलै रोजी पंत पॉझिटिव्ह आढळला होता. एका परिचिताच्या ठिकाणी तो क्वारंटाईनमध्ये असून गुरुवारी संघासोबत तो डरहॅमला रवाना झालेला नाही,’ असे स्पष्ट केले. त्याच्या दोन आरटी-पीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर तो संघात सामील होणार आहे. यापुढे संपूर्ण संघाची दररोज चाचणी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भरत अरुण, ईश्वरन व साहा हे निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे. मात्र इंग्लंडमधील आरोग्य खात्याच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे समजते.
इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भारतीय संघाला त्याबाबत सावध राहण्याचा इशारा देणारे पत्र ई-मेलद्वारे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पाठविले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाल्यानंतर संघाला ब्रेक देण्यात आला होता.
‘आपल्या संघातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय, हे खरे असून गेल्या आठ दिवसापासून तो आयसोलेट आहे. मात्र संघासोबत तो हॉटेलरूममध्ये राहत नसल्याने इतर खेळाडूंवर त्याचा परिणाम झालेला नाही,’ असे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ‘संघातील अन्य कोणताही खेळाडू पॉझिटिव्ह नाही. शिवाय कोव्हिड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात जय शाह यांनी संघाला पत्रही पाठविले होते,’ असेही ते म्हणाले. पंतला डेल्टा व्हेरियंटची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले असून इंग्लंडमध्ये या प्रकारच्या रुग्णांची वाढत असल्याचे दिसून आले आहे. पंत युरो चषक स्पर्धेतील फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता आणि त्याची छायाचित्रे त्याने सोशल मीडियावरही टाकली होती. अल्पसा ताप आल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली होती आणि त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. संघातील खेळाडूंना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे.