नाशिक विभागीय धर्मादाय सह आयुक्तातंर्गत नाशिकसह धुळे, नंदुबार, जळगाव जिह्याचा समावेश
कोल्हापूर / राजेंद्र होळकर
मुंबई उच्च न्यायालयाने रुई (ता. हातकणंगले) येथील जयसिंग पांडूरंग झपाटे यांची नाशिक विभागाच्या धर्मादाय सह आयुक्तपदी नियुक्ती केली. या विभागातंर्गत नाशिक जिह्यासह धुळे, नंदुबार आणि जळगाव हे जिल्हे येतात. या चार जिह्याच्या धर्मादाय सह आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने झपाटे यांचे रुईसह इचलकरंजीमध्ये अभिनंदन केले जात आहे.
झपाटे यांनी शेतीकरीत रुई येथे प्राथमिक शिक्षण घेतले. तर माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण इचलकरंजीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वकील म्हणून काम करायचेच असा निश्चय करुन, कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. त्यांनी 1995 ला लॉ चे शिक्षण पूर्ण केले. इचलकरंजी न्यायालयात जेष्ट वकील एम.डी.जमादार यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करु लागले. वकीली करीत त्यांनी 1998 ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परिक्षा दिली. त्यामध्ये ते चांगल्या गुणाने उर्त्तीण झाले. त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती झाली. या ठिकाणी त्यांनी काही काळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार म्हणून काम केल्यानंतर राजापूर (जि.रत्नागिरी), कल्याण (जि.ठाणे) येथे बदली झाली. यासर्व बदलीच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उठविला.
याचदरम्यान झपाटे यांनी 2014 ला जिल्हा व सत्र न्यायाधिश पदाची परिक्षा दिली. या परिक्षेमध्ये देखील ते चांगल्या गुणाने उर्त्तीण झाले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश म्हणून रत्नागिरी येथे निवड झाली. त्यांच्या न्याय दानाची व यशस्वी कार्याची दखल घेवून, मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच त्यांची नाशिक विभागाच्या धर्मादाय सह आयुक्त पदावर नियुक्ती केली. त्यांच्या या नियुक्तीने गावात अभिनंदन केले जात आहे.