राज्य सरकारकडून दरपत्रक जारी : दोन पद्धतीची दर आकारणी निश्चित
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे गरीब जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच रुग्णवाहिकांकडून मनमानी लूट होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच दर आकारणी करावी. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने रुग्णवाहिका चालकांना दिला आहे.
कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत काही रुग्णवाहिकाचालक रुग्णांकडून भरमसाठ दर वसूल करत आहेत. याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे रुग्णवाहिकांसाठी राज्य सरकारने दोन पद्धतीचे दर निश्चित केले आहेत. सामान्य रुग्णवाहिका आणि लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱया रुग्णवाहिका अशी वर्गवारी करण्यात आली आहे. सामान्य रुग्णवाहिकांसाठी पहिल्या 10 कि. मी. पर्यंत कमाल 1,500 रुपये आणि 10 कि. मी. नंतरच्या अंतरासाठी प्रती कि. मी. साठी 120 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर पीपीई किट, ऑक्सिजन, ग्लोव्हज, मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ड्रायव्हर यांच्या शुल्कासह समाविष्ट आहे. तर वेटींग चार्ज (प्रतिक्षा) प्रती तास 200 रुपये असणार आहे.
तर बेसिक लाईफ सपोर्ट असणाऱया रुग्णवाहिकांना पहिल्या 10 कि. मी. साठी कमाल 2 हजार रुपये आणि त्यानंतरच्या प्रती कि. मी. साठी 120 रुपये आकारता येणार आहे. यामध्ये देखील पीपीई किट, ऑक्सिजन, ग्लोव्हज, मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ड्रायव्हर यांच्या खर्चाचा समावेश आहे. तर वेटींग चार्ज प्रतीतास 250 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
हा दर निश्चित करताना नोंदणी खर्च, विमा खर्च, कर्मचाऱयांचा खर्च, टायर व इतर खर्चांचा विचार करण्यात आला आहे, असे सरकारने आदेशपत्रकात स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री, आरोग्य-कुटुंब कल्याणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.