ढाका
दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याच्या कारणास्तव बांगलादेशाने मुलांच्या शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीत आणखी दोन आठवडे शाळा, महाविद्यालये बंद असणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये 543 दिवस बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी कोरोनाचे प्रमाणही घटले होते. त्यामुळे अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला होता. ऑनलाइन शिक्षणापासून मुक्ती मिळाल्याचा जास्त आनंद मुलांना शाळा सुरू झाल्यानंतर झाला होता. परंतु ओमिक्रॉन व्हेरियंट रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने प्रशासनाने शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. आधी शाळा 6 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार होत्या. अलीकडच्या काळामध्ये नव्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याची बाब दिसून आली. जानेवारीमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये दोन लाखाने भर पडली होती. परिणामी देशाने शाळा सुरक्षेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.