हरियाणातील फरिदाबाद जिल्हय़ातील सार्वजनिक स्वास्थ्य केंद्रात करणाऱया एका महिला डॉक्टरने रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून स्वतःचा विवाह टाळला आहे. डॉ. राखी असे त्यांचे नाव आहे. मे महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. सर्व तयारीही पूर्ण करण्यात आली होती. तथापि गेल्या महिन्यापासून अचानकपणे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांच्यावरील कामाचा ताणही वाढला. त्या रुग्णालयात प्रतिदिन 12 तास काम करतात. तसेच कित्येकदा साप्ताहिक सुटीही घेत नाहीत.
सध्याच्या आव्हानात्मक काळात विवाह बंधनात अडकल्यास रुग्णसेवेत खंड पडेल, अशी चिंता त्यांना वाटते. परिणामी त्यांनी विवाह सध्या तरी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्या व्यक्तिगत सुखापेक्षा कर्तव्याचे पालन आपण महत्त्वाचे मानत आहोत. त्याचप्रमाणे लग्न नंतर करता येईल पण प्रथम कोरोना हटविण्याचे उत्तरदायित्व आपल्या पार पाडावयास हवे, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या या निर्णयाला त्यांनी आपल्या कुटुंबाचे समर्थनही मिळविले आहे. कुटुंबाचे मन वळविण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. तथापि त्यांच्या निर्धारासमोर कुटुंबानेही मान तुकविली. आणि त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, असे कर्तव्य तत्पर डॉक्टरच कोरोनावर अखेरचा घाव घालू शकतील, असा विश्वास त्यांच्या शहरातील लोक व्यक्त करीत आहेत.