कोरोनावरील उपचाराकरता नवे दिशानिर्देश : स्टेरॉइडमुळे ब्लॅक फंगसचा धोका : तीव्र खोकला असल्यास टीबीची चाचणी करा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या उपचाराशी संबंधित स्वतःच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये केंद्र सरकारने काही बदल पेले आहेत. नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये रुग्णांना स्टेरॉइड देणे टाळा, स्टेरॉइडच्या वापरामुळे ब्लॅक फंगससारखा अन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो, असा सल्ला डॉक्टरांना देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच नॅशनल कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी कोरोनाच्या दुसऱया लाटेत औषधांचा गरजेपेक्षा अधिक वापर करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्टेरॉइड्स अत्यंत लवकर आणि अधिक प्रमाणात किंवा दीर्घ काळापर्यंत देण्यात आल्यास रुग्णांना अन्य गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
स्टेरॉइडच्या अधिक वापरामुळे हृदयविकाराचा झटका, यकृताची समस्या, टय़ूमर, हाडांना ईजा होणे, शरीराची वाढ थांबणे, वंध्यत्व, केस गळती, नैराश्य इत्यादी आजार होऊ शकतात. तरीही डॉक्टरांकडून अनेक प्रकरणांमध्ये स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जाते.
भारतात कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान रुग्णांवर स्टेरॉइड्सचा वापर करण्यात आला होता. याच्या अत्याधिक मात्रेमुळे अनेक रुग्णांना ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला आणि कित्येकांनी स्वतःचा जीव देखील गमावला होता. रुग्णांना हाय शूगर लेव्हल तसेच हृदयसंबंधी विकारांना तोंड द्यावे लागले होते. काही रुग्णांना हाडांमध्ये तीव्र वेदना, चालताना तसेच झोपताना त्रासाला सामोरे जावे लागले होते.
सरकारचे नवे दिशानिर्देश
यात कोरोनाच्या सौम्य, सामान्य आणि गंभीर संक्रमणासाठी विविध औषधांचा डोस सांगण्यात आला आहे.
एखाद्या रुग्णाला 2-3 आठवडय़ांपर्यंत खोकला राहिल्यास त्याने टीबी किंवा अन्य आजारांची चाचणी करवून घ्यावी.
श्वास घेण्यास त्रास, परंतु ऑक्सिजन पातळी कमी होत नसल्यास अशा रुग्णांना सौम्य संक्रमणाच्या शेणीत ठेवण्यात आले आहे.
सौम्य संक्रमण असलेल्या रुग्णाला 5 दिवसांहून अधिक वेळ श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याने त्वरित डॉक्टरांकडे जावे.
श्वास घेण्यास खूपच त्रास होत असल्यास आणि ऑक्सिजन पातळी 90-93 दरम्यान असलेल्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे. अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात यावा.
रेस्पिरेटरी रेट जर प्रति मिनिट 30 च्या वर आहे, रुग्ण श्वास घेऊ शकत नसल्यास आणि ऑक्सिजन पातळी 90 टक्क्यांच्या खाली असल्यास रुग्णाला गंभीर मानले जावे. त्वरित आयसीयूत दाखल करण्यात यावे.
सौम्य ते गंभीर लक्षणे असल्यास रेमडेसिविरच्या इमर्जन्स किंवा ‘आाrफ लेबल’ वापराला मंजुरी देण्यात आली. याचा वापर केवळ लक्षण दिसून आल्याच्या 10 दिवसात रेनल किंवा हेप्टिक डिस्फंक्शनची तक्रार नसलेल्या रुग्णांवर होईल.
रुग्णांच्या स्थितीत स्टेरॉइडच्या वापरानंतरही सुधारणा होत नसलेल्या रुग्णांकरता टोसिलिजुमॅब औषधाचा वापर केला जाऊ शकतो. अशा रुग्णांमध्ये कुठलेही बॅक्टेरिया, फंगल किंवा टय़ूबरकुलर संक्रमण असू नये. 60 वर्षांहून अधिक रुग्णांना हृदयविकार, हायपरटेंशन, मधूमेह, एचआयव्ही, टीबी, यकृत, किडनीचे आजार असल्यास त्यांना कोरोना संक्रमणाचा सर्वात अधिक धोका आहे.