तामिळनाडूतील धक्कादायक घटना : कुटुंबीयांची निदर्शने
वृत्तसंस्था /चेन्नई
शारीरिक शिक्षणाची 18 वर्षीय विद्यार्थिनी आणि फुटबॉलपटू आर. प्रियाचा मंगळवारी सकाळी चेन्नईतील राजीव गांधी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. प्रिया ही राज्यस्तरीय फुटबॉलपटू होती आणि चेन्नईच्या क्वीन मेरी कॉलेजमधून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करत होती. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे प्रियाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
प्रियाच्या कुटुंबीय आणि मित्रांनी रुग्णालया शवागाराच्या बाहेर निदर्शने केली आहेत. कुटुंबीयांनी प्रियाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रियाचा मृतदेह शवागाराबाहेर काढण्यापासून त्यांनी रोखले आहे. याचदरम्यान पोलीस उपायुक्त अल्बर्ट जॉन यांनी तपासासाठी स्थापन डॉक्टरांच्या पथकाच्या अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
गुडघ्याची झाली होती शस्त्रक्रिया
प्रियाच्या गुडघ्यातील लिंगामेंटला नुकसान पोहोचल्याने तिला चेन्नईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यावर तिचा पाय ठीक होण्याऐवजी सुजू लागला होता. प्रकृती बिघडल्यावर प्रियाला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रियाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी तिचा उजवा पाय कापण्याचा निर्णय घेतला होता.
आरोग्यमंत्र्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रियाच्या निधनानंतर आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच प्रियाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित केले जाणार आहे. तसेच प्रियाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. प्रियाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.