व्हाइट हाउसमध्ये पोहोचताच मास्क हटविला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपचारानंतर सोमवारी रात्री रुग्णालयातून व्हाइट हाउस येथे पोहोचले आहेत. कोरोनाला घाबरण्याची गरज नसल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. परंतु त्यांच्या डॉक्टर्सनी अध्यक्षांना प्रकृतीची अधिकच काळजी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे. व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी मास्कही हटविला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह 15 अधिकारी आणि खासदार बाधित आढळले आहेत.
ट्रम्प 15 ऑक्टोबर रोजी होणाऱया दुसऱया अध्यक्षीय वादविवादात भाग घेऊ शकतात अशी चर्चा आहे. परंतु व्हाइट हाउसकडून आतापर्यंत याची औपचारिक पुष्टी देण्यात आलेली नाही.
उपचार सुरूच राहणार
ट्रम्प यांच्यावरील उपचार सुरूच राहणार असल्याचे व्हाइट हाउसमधील ट्रम्प यांचे खासगी डॉक्टर सीन कोनले यांनी म्हटले आहे. रुग्णालयातून ट्रम्प हे सूट आणि मास्क परिधान करून बाहेर पडले, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांनी हात उंचावून अभिवादन केले आहे. कोविड-19ला घाबरण्याची गरज नाही, कोरोनाला तुम्ही सहजपणे पराभूत करू शकता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
वादविवादात भाग घेणार
15 रोजी होणाऱया अध्यक्षीय वादविवाद कार्यक्रमात ट्रम्प हे सामील होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. याकरता ट्रम्प यांनी तयारीही सुरू केल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प दुसऱया वादविवादात सामील होतील, यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. त्यांचे प्रचारपथक यासंबंधी कमिशन ऑफ डिबेटला माहिती देईल. अधिकृत घोषणा नंतर होणार असल्याचे प्रचारमोहिमेचे व्यवस्थापक रायन नोब्स यांनी म्हटले आहे.
लोकांनी पाहिले थेट प्रसारण
ट्रम्प यांना मास्कशिवाय व्हाइट हाउसमध्ये जाताना लोकांनी टीव्हीवरील थेट प्रसारणाद्वारे पाहिले आहे. अध्यक्षांचे डॉक्टर कोनले यांनी अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आहे. अध्यक्षांच्या प्रकृतीवर सातत्याने देखरेख ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांच्या माध्यम सचिव कॅली मॅक्केनी या देखील कोरोनाने ग्रस्त आढळल्या आहेत.