विजापुरातील घटना : कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून कृत्य
वार्ताहर/ विजापूर
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत रुग्णालयासमोर थांबलेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक केली आहे. ही घटना विजापूर शहरातील बंजारा रुग्णालयासमोर रविवारी उशिरा घडली. तसेच डॉक्टरांविरुद्ध आक्रोश व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोरोनाची लक्षण आढळून आल्याने काशिनाथ चव्हाण (वय 59, रा. हडलसंग तांडा, ता. इंडी) यांना उपचारासाठी बंजारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने काशिनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबियांनी रात्री उशिरा रुग्णालयासमोर उभारलेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक केली आहे. यात रुग्णावाहिकेच्या संपूर्ण काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
रुग्ण ऑक्सीजन पाईप काढून टाकत असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱयांनी त्यांना झोपेचे इंजक्शन दिल्याचे समजते. कोरोनाची बाधा झालेल्या काशिनाथ यांना अनावश्यक झोपेचे इंजक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
आतापर्यंत 6 लाख रुपये भरून घेतले असून आणखी 3 लाख भरण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. यावरून रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली आहे. घटनास्थळी गांधीचौक पोलीस स्थानकाचे पीएसआय अशिफ मुशापुरी यांनी भेट देऊन पाहणी केली.