प्रतिनिधी/खेड
सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील समाजभूषण त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राध्यापक सतिश साठे यांची महाराष्ट्र रूग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित असणारी संपूर्ण आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याची वस्तूस्थिती आहे. रूग्णांचे शोषण करून आर्थिक नफा मिळवण्यासाठी निर्माण झालेल्या रूग्णालयात रूग्णांची आर्थिक लूट होत आहे. पंचतारांकित सुविधेच्या नावाखाली भरमसाठ बिलांची आकारणी केली जात आहे. यात सर्वसामान्य जनता भरडली जात असून असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
या रुग्णांच्या पिळवणुकीविरुद्ध आवाज उठवून रूग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी रूग्ण हक्क परिषद अविरतपणे कार्यरत आहे. रूग्णांच्या हक्काची चळवळ असलेल्या रूग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश चिटणीसपदी प्रा. सतिश साठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रा. साठे यांचे शैक्षणिक चळवळीत विशेष योगदान असून परिस्थितीअभावी गांजलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची अविरतपणे धडपड सुरू आहे. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठीही ते नेहमीच अग्रस्थानी असतात. सामाजिक कार्याची दखल घेवून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.