इंग्लिश संघ डावाअखेर 27 धावांनी आघाडी, सिराजचे 4 बळी, रुट हंगामात 5 शतके झळकावणारा पहिला इंग्लिश कर्णधार
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश कर्णधार जो रुटने 321 चेंडूत नाबाद 180 धावांची दमदार खेळी साकारल्यानंतर इंग्लंडने येथील लॉर्ड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 27 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या पहिल्या डावातील 364 धावांना प्रत्युत्तर देताना त्यांनी 128 षटकात सर्वबाद 391 धावांची मजल मारली.
भारतीय गोलंदाज शनिवारी दिवसभरातील तिन्ही सत्रात विशेषतः रुटला अडचणीत आणण्यात अजिबात यशस्वी ठरले नाहीत. उलटपक्षी, रुटने संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधत भारतीय गोलंदाजांवर दडपण राखले. यजमान संघाने पहिल्या सत्रात 97 तर दुसऱया सत्रात 98 धावा जमवल्या आणि भारतीय गोलंदाजी बोथट होत चालली असल्याचे हे संकेत होते. रुटने विशेषतः बॅकफूटवर जात उत्तम फटके लगावले आणि तोच कित्ता बऱयाच प्रमाणात त्याच्या सहकाऱयांनी देखील गिरवला.
मोहम्मद सिराज हा भारताचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 30 षटकात 94 धावात 4 बळी घेतले. सिराजने जम बसलेल्या जॉनी बेअरस्टोचा (107 चेंडूत 57) तर इशांत शर्माने जोस बटलरचा (42 चेंडूत 23) त्रिफळा उडवत ब्रेकथ्रू मिळवून दिले.
आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासूनच भारतीय गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत आलेल्या अनुभवी जो रुटने तीच मालिका या कसोटी मालिकेत देखील कायम राखली. या मालिकेत नॉटिंगहममधील पहिल्या कसोटीतही त्याने आपल्या बॅटीचा जलवे दाखवले होते. येथे बेअरस्टो सिराजच्या गोलंदाजीवर कोहलीकरवी झेलबाद होण्यापूर्वी रुटने त्याच्यासह चौथ्या गडय़ासाठी 121 धावांची भागीदारी केली होती. पुढे इशांतने फुल लेंग्थ चेंडूवर बटलरचा भक्कम बचाव भेदून काढला.
यादरम्यान, रुटने कसोटी कारकिर्दीतील 22 वे शतक झळकावले. शिवाय, एकाच हंगामात 5 शतके झळकावणारा पहिला इंग्लिश कर्णधार ठरला.
शमी (26 षटकात 2-95) व सिराज यांनी पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात 6 चौकार बहाल केल्यानंतर फिल्ड कशी तैनात करायची, हा प्रश्न कर्णधार विराटसमोर उभा ठाकत राहिला.
इंग्लंडचे शेवटचे 4 फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. जेम्स अँडसरन शेवटच्या फलंदाजाच्या रुपाने बाद झाला. त्याला शमीने त्रिफळाचीत केले. इंग्लिश कर्णधार जो रुट 321 चेंडूत 180 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 18 चौकारांचा समावेश
राहिला.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 364
इंग्लंड पहिला डाव ः बर्न्स पायचीत गो. शमी 49 (136 चेंडूत 7 चौकार), सिबली झे. राहुल, गो. सिराज 11 (44 चेंडूत 1 चौकार), हसीब हमीद त्रि. गो. सिराज 0 (1 चेंडू), जो रुट नाबाद 180 (321 चेंडूत 18 चौकार), बेअरस्टो झे. कोहली, गो. सिराज 57 (107 चेंडूत 7 चौकार), बटलर त्रि. गो. इशांत 23 (42 चेंडूत 4 चौकार), मोईन अली झे. कोहली, गो. इशांत 27 (72 चेंडूत 4 चौकार), सॅम करण झे. रोहित, गो. इशांत 0 (1 चेंडू), रॉबिन्सन पायचीत गो. सिराज 6 (22 चेंडूत 1 चौकार), मार्क वूड धावचीत (जडेजा-पंत) 5 (23 चेंडू), अँडरसन त्रि. गो. शमी 0 (16 चेंडू). अवांतर 33. एकूण 128 षटकात सर्व बाद 391.
गडी बाद होण्याचा क्रम ः1-23 (सिबली, 14.2), 2-23 (हमीद, 14.3), 3-108 (बर्न्स, 41.2), 4-229 (बेअरस्टो, 78.4), 5-283 (बटलर, 90.6), 6-341 (मोईन, 110.5), 7-341 (सॅम करण, 110.6), 8-357 (रॉबिन्सन, 116.6), 9-371 (वूड, 124.3), 10-391 (अँडरसन, 127.6)
केएल राहुलच्या दिशेने बॉटल कॉर्क फेकल्याने गोंधळ
उपाहारापूर्वीच्या सत्रात प्रेक्षकांच्या गॅलरीमधून केएल राहुलच्या दिशेने बॉटल कॉर्क फेकली गेल्याने मैदानावर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शमी डावातील 69 व्या षटकात गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. विराटने यावेळी निराशा व्यक्त केली आणि राहुलला तो कॉर्क मैदानाबाहेर टाकण्यास सांगितले. भारतीय खेळाडू यावेळी मैदानी पंचांशी चर्चा करताना दिसून आले.