डॉलरच्या तुलनेत नीचांकी मूल्यावर भारतीय चलन : आयात अधिकच महागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदली गेली आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेचे चलन मजबूत होत असल्याने रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 77.42 स्तरावर पोहोचले आहे.
मोठय़ा घसरणीसह सत्र सुरू झाल्यावर आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात रुपया काही क्षणातच डॉलरच्या तुलनेत 77.17 वर पोहोचला होता. मागील आठवडय़ात शुक्रवारी भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत 55 पैशांनी कमजोर होत 76.90 वर त्याचे मूल्य राहिले होते.
विदेशी चलन भांडार
देशाचा विदेशी चलन भांडार सातत्याने कीम होत आहे. हा भांडार कमी होत 600 अब्ज डॉलर्सच्या खाली आला आहे. 29 एप्रिल रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठा 2.695 अब्ज डॉलर्सने कमी होत 597.73 अब्ज डॉलर्सवर आला होता. त्यापूर्वी 22 एप्रिल रोजी संपलेल्या आठवडय़ात 3.271 अब्ज डॉलर्सच्या कमीसह विदेशी चलन साठा 600.423 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.
सर्वसामान्यांवर पडणार प्रभाव
रुपयातील घसरणीचा सर्वाधिक प्रभाव आयात केल्या जाणाऱया क्षेत्रांवर पडणार आहे. भारत कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 80 टक्के आयात करत असतो. अशा स्थितीत रुपयातील घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या आयात बिलात वाढ होईल आणि विदेशी चलन अधिक खर्च होणार आहे. याचबरोबर खत आणि रसायनांचा भारत सर्वात मोठा आयातदार आहे. रुपयाचे मूल्य कमी झाल्याने खत आणि रसायनांचा आयात महागणार आहे. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सामग्रीपासून दागिने देखील महागणार आहेत.
काँग्रेसकडून टीकास्त्र
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील घसरणीवरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारचे धोरणपंगुत्व, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळे रुपया आयसीयूत गेल्याची टीका काँग्रेसने केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 77.41 या नीचांकी स्तरावर पोहोचले असल्याचे म्हणत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.