वृत्तसंस्था/ बार्सिलोना
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणारा रशियाचा टेनिसपटू आंद्रेय रुबलेव्ह यालाही कोरोनाची लागण झाली आहे. या महिन्यात अबु धाबीमध्ये झालेल्या प्रदर्शनीय स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंत कोरोनाची लागण झालेला रुबलेव्ह हा पाचवा खेळाडू आहे. याआधी राफेल नदाल, त्याचा प्रशिक्षक कार्लोस मोया, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, बेलिंडा बेन्सिक, ऑन्स जेबॉर, यांना लागण झाली आहे. हे सर्व खेळाडू अबु धाबीतील स्पर्धेत सहभागी झाले होते.
‘मी सध्या बार्सिलोनात असून दुर्दैवाने मला कोव्हिडची लागण झाली आहे. मी आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व प्रोटोकॉल्सचा अवलंब करीत आहे,’ असे त्याने ट्विटमधून सांगितले. 1 जानेवारीपासून एटीपी चषक स्पर्धा होणार असून त्यात तो रशियाचे प्रतिनिधित्व करणार होता. त्याचे पूर्ण लसीकरण झाले असून त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.