प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-नंदगड रस्त्यावर रुमेवाडी क्रॉसनजीक ट्रक्टरची एका दुचाकीला जोराची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री 7 च्या दरम्यान घडली. ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव सिद्ररामाप्पा मल्लेशी कोटी (वय 45 रा. तेली गल्ली, नंदगड) असे आहे.
बुधवारी रात्री सिद्ररामाप्पा कोटी हे आपल्या दुचाकीवरून खानापूरकडे जात होते. त्याचवेळी खानापूरहून रुमेवाडीकडे येणाऱया एका ट्रक्टरने कोटी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे कोटी हे जागीच ठार झाले. धडक दिलेला ट्रक्टरही उलटला. त्यानंतर ट्रक्टर चालकाने पलायन केले. अपघाताचे वृत्त समजताच खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांचे सहकारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कोटी यांचा मृतदेह खानापूराच्या शवागृहात हलविला. सिद्ररामाप्पा हे खानापुरातील लैला शुगर कारखान्यात स्टोरकिपर म्हणून कामाला होते. त्यांची बुधवारी रात्री 8 वाजता हजेरी होती. त्यामुळे ते कारखान्याकडे जात असताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.