भोगावती / राजू घाटगे
राशिवडे गावातील प्राथमिक कन्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या हरहुन्नरी व हुशार रूंजीचा सोमवारी अपघाती मृत्यू झाला आणि अनेक महिला व पुरूषांसह अबाल वृद्धांच्याही मनाला चटका लावून गेला.या एकुलत्या लेकीला मृत्यूने कवटाळले असले तरीही मृत्युशी झुंज देणाऱ्या बापांवर बेळगांवच्या एका रूग्णालयात उपचार चालू आहेत.
राशिवडे गावात शुक्रवार पासून बिरदेवाची माही यात्रा चालू आहे. सासुबाईला यात्रेसाठी आणण्यास निघालेल्या बापाबरोबर रूंजीही हटून आजोळी नाईंग्लजला जात होती. मोटारसायकलवरील बापलेकीला समोरून येणाऱ्या कर्नाटकच्या बसने राँग साईटला येऊन जोरात ठोकरले अन सगळा खेळ संपला.निपाणी ते मुधोळ मार्गावरील नवलीहाळ क्राँसजवळ रविवारी दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.गंभीर जखमी बापाचे नाव सुनील उर्फ दशरथ कृष्णात तोडकर वय ३२ असून मयत रूंजीचे संपूर्ण नाव कु अंजली उर्फ रंजिता असे आहे.गेल्याच महिन्यात १५ फेब्रुवारी रोजी तिचा आजोबा कृष्णात कुटूंबियांनी दारात मांडव घालून थाटामाटात सातवा वाढदिवस साजरा केला होता.
राशिवडे गावातील प्राथमिक कन्या शाळेत पहिलीच्या वर्गात उज्वल यश मिळविलेल्या रूंजीचा आज गौरव करण्यात येणार होता.मात्र दुर्दैवाने तिच्या मृतदेहांवरच फुले वाहण्याची दुर्दैवी वेळ शाळा व कुटूंबियांवर आली.तीला नृत्यकलेची चांगलीच आवड होती.तर ती उत्तम प्रकारे गाणीही गात असत.गल्लीतील कोणीही काम सांगितले तरी नाही न म्हणणाऱ्या रुंजीच्या अनेक आठवणींना अंत्यदर्शनासाठी आलेल्या महिलांनी अश्रूंच्या साक्षीने उजाळा दिला.तर रूंजीच्या मम्मीसह आजी आजोबांचा आक्रोशाने उपस्थितांची मने पिळवटून टाकली.