प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर परिसरात ऍम्ब्युलन्स अर्थात रूग्णवाहिका लावणाऱ्या रूग्णवाहिकाचालकांकडून केएमटीने पार्किंगच्या नावाखाली तासाला वीस रूपयांची वसुली सुरू केली आहे. त्यामुळे रूग्णवाहिका लावणाऱया चालक आणि मालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे आम्ही जरी व्यावसायिक तत्वावर रूग्णवाहिकेची सेवा देत असलो तरी ही आरोग्य सेवा आहे. देशात कुठेही रूग्णवाहिकेच्या पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या केएमटीकडून आता शुल्क आकारणी सुरू करून अन्याय केला जात असल्याची भावना रूग्णवाहिका चालक व्यक्त करत आहेत.
शहरातील सीपीआर परिसरात महापालिकेची जागा पार्किंगसाठी आहे. या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारले जाते. शुल्क वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेने केएमटीकडे दिली आहे. या पार्किंगमध्ये इतर वाहनांप्रमाणे गेली अनेक वर्षे रूग्णवाहिकाही लावल्या जातात. या रूग्णवाहिकांच्या माध्यमातून सीपीआरमधील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सेवा दिली जाते. मृतदेह नेण्याबरोबरच गंभीर रूग्ण, अपघातातील जखमींना ने-आण करण्याचे काम या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून होते. त्यासाठी हे रूग्णवाहिका चालक पैसेही आकारतात. महापालिकेची रूग्णवाहिकाही शहराच्या हद्दीत कार्यरत आहे.
मात्र सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णांसह सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सांगली, बेळगाव जिल्हÎातील रूग्णही उपचारासाठी येत असतात. त्यांना सेवा देण्याबरोबर मृतदेह गावाकडे नेण्यासाठी या रूग्णवाहिकांची सेवा उपयुक्त ठरते. सीपीआर परिसरात केवळ आठच रूग्णवाहिका लावल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसापासून या रूग्णवाहिका पार्क केल्याबद्दल तासाला वीस रूपयांची पावती केली जात आहे.
रूग्ण अथवा मृतदेह नेण्यासाठीचे भाडे हे दररोज येईलच याची शाश्वती नाही. तरीही सेवा म्हणून योग्य भाडे घेऊन सेवा दिली जाते. त्याचबरोबर कधीकधी तोटाही सहन करावा, लागतो. कोरोनाच्या काळात तर असंख्य रूग्णांना माफक दरात अथवा मोफत सेवा देण्याचे कामही या रूग्णवाहिकांच्या माध्यमातून झाले आहे. आज जर तासाला वीस रूपयांप्रमाणे पार्किंग शुल्क द्यावे लागले तर किमान दहा तास रूग्णवाहिका पार्किंग केली तर दोनशे रूपये द्यावे लागणार आहेत. ते परवडणारेही नाही. देशात कुठेही रूग्णवाहिका पार्किंगला शुल्क आकारले जात नाही. पण कोल्हापूर महापालिका केएमटीच्या माध्यमातून शुल्क आकारत आहे. हा अन्याय आहे. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शुल्क माफ करण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे कोल्हापूर शहर रूग्णवाहिका सेवा संस्थेचे अध्यक्ष बशीर तहसिलदार यांनी सांगितले.