प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधित रूग्णालयात दाखल झाल्यानंतर नातेवाईक त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी धडपड असतात. रूग्णालयात दररोज नातेवाईक गर्दी करत असतात. यामुळे वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीसांना एका नातेवाईकाला बंधनकारक केले आहे. त्यासाठी पासची व्यवस्था उभारण्यात आली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
जिल्हा शासकीय रूग्णालय, कोविड सेंटर व इतर खाजगी रूग्णालयात दाखल असणाऱया रूग्णांचे नाव पुढे करत अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यांना पोलीसांनी अडवले असता, ते फाईल दाखवून रूग्णांची नावे पुढे करत आहेत. ही बाब पोलीसांच्या लक्षात आल्याने कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांना पास देण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयात दाखल असलेल्या बाधिताच्या एकाच नातेवाईकाला रूग्ण दाखल असेपर्यंत पास मिळवून रूग्णालयात जाता येणार आहे. या पाससाठी व्यवस्थापनास संबंधित रूग्णांच्या नातेवाईकाने त्याचे नाव द्यायचे आहे. त्यानंतर व्यवस्थापन रूग्णाच्या नातेवाईकास पास देणार आहे. या पासच्या आधारे रूग्णांच्या नातेवाईकास रूग्णालय परिसर आणि इतर ठिकाणी आवश्यक गोष्टींसाठी जाण्यास परवानगी राहणार आहे. खाजगी रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांसाठी पास देण्यासाठी यंत्रणा पुढील टप्प्यात उभारणार आहे. सध्या खाजगीत दाखल असलेल्या रूग्णाच्या नातेवाईकाला आवश्यकता असल्यास रूग्णालयात जाता येणार असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली.