अचूक बातमी “तरुण भारत”ची; शुक्रवार 26 नोव्हेंबर, सकाळी 10.45
● रूग्णवाढ आटोक्यात आल्याने बेड संख्या झाली कमी
● इतर रूग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड उपलब्ध
● गृहविलिगीकरणात उपचार वाढले
● गेला 24 तासात नव्या 22 रूग्णांची भर
● गुरुवारी 16,032 जणांना लस
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येचा आलेख घटल्याने शासकीय आणि खासगी रूग्णालयातील कोविड वॉर्डनीही मोकळा श्वास घेतला आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, फलटण या तालुक्यातील काही खासगी रूग्णालयात बेड कमी झाले असले तरी काही कोविड वॉर्ड अजुनही सुरू आहेत. रूग्णांच्या अल्पवाढीसह इतर जिल्ह्यातून आलेल्या रूग्णांवरही उपचार होत आहेत. मात्र अपवादात्मक रूग्णच रूग्णालयात भरती होत असून बरेच रूग्ण हे गृहविलिगीकरणात उपचारार्थ आहेत. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात 22 रूग्णांची वाढ झाली असून.2841 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
कोरोना रूग्णांची हेळसांड थांबली
जिल्ह्यात सप्टेंबर, आक्टोंबर महिन्यापर्यंत कोरोना रूग्णांना आणि नातेवाईकांना रूग्णालयात बेड मिळवण्यासाठी प्रचंड धावाधाव करावी लागत होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात रूग्णवाढ कमालीची आटोक्यात आल्याने बेड मिळवण्यासाठीची धावधाव थांबली आहे. व्हेंटिलेटर बेडही सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे कोरोना रूग्णांची हेळसांड थांबली आहे. अपवाद वगळता बरेच रूग्ण हे गृहविलिगीकरणातच उपचार घेत असल्याचे जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने सांगितले. रूग्णालयातील कोविड वॉर्ड मोकळे होऊ लागल्याने इतर आजारांच्या रूग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.
पालक द्विधा मनस्थितीत
1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने हा निर्णय घेतला गेला असला तरी एका बाजुला राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात सौम्य लाट येऊ शकते असे संकेत देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यातच मुलांच्या लसीकरणावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे लहान मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांच्यात संभ्रम आहे. कारण पाचवीपासूनच्या मुलांना नियम पाळण्याची सवय होऊ शकते. मात्र पहिली, दुसरीच्या मुले नियमाच्या चौकटीत थांबतील का? हा प्रश्न पालकांच्या मनात आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,89,525
एकूण बाधित 2,51, 788
कोरोनामुक्त 2,44,387
एकूण मृत्यू 6,476
सक्रीय रुग्ण 233
शुक्रवारी जिल्हय़ात
बाधित 22