प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारी सायंकाळनंतर जिल्हय़ात 13 नवे रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधीतांची संख्या 700 च्या उंबरठय़ावर पोहचली आहे. नव्या रूग्णांमध्ये लोटे औदयोगिक वसातीशी संबधीत 7 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ाची कोरोना रूग्णांची संख्या 696 झाली आहे. दरम्यान, शनिवारी एका रूग्णाला रत्नागिरीतून डिस्चार्ज मिळाला असून कोरोनामुक्तांची संख्या 461 झाली आहे.
शुक्रवारी रात्री सापडलेल्या 13 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चिपळूण येथील 3 रुग्ण राजापूर येथील 1, रत्नागिरी येथील 2 आणि लांजा येथील 1, खेड येथील 5 व दापोलीतील एकाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ऍक्टीव्ह पॉझीटीव्ह रूग्ण संख्या 209 आहे. त्यापैकी 4 रुग्णांवर रुग्णालयाच्या बाहेर उपचार चालू आहेत. यामध्ये दोघांवर पुणे, एकावर पोलादपूरमध्ये तर एकावर घरीच उपचार सुरू आहेत.
ऍक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिह्यात सध्या 49 ऍक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
नऊ हजार निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 10 हजार 297 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 10 हजार 163 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 696 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 9 हजार 453 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 134 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 134 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
चिपळूण शहर,खेर्डीत दोन रूग्ण
चिपळूणः शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालानुसार शहरातील काविळतळी आणि खेर्डी-माळेवाडी येथे दोन नवे रूग्ण सापडले असून शहरातील वाढत्या रूग्ण संख्येने नागरिकांची चिंता वाढली आहे. चालली आहे. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 124 वर पोहचली आहे. लोटेतील घरडा कंपनीत झालेल्या कोरोना प्रादुर्भावाचे परिणाम चिपळूणवरही जाणवू लागले असून दोन्ही नवे रूग्ण याच कंपनीतीलच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहर परिसरात आढळलेल्या पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची यादी वाढत चालली असून या सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. काविळतळी येथील इमारत आयसोलेट करण्यात आली असुन शुक्रवारी अकरा पॉझिटीव्ह सापडल्यानंतर गोवळकोट रोड परिसर कमान ते बाजारपुलापर्यंतचा भाग आयसोलेट करण्यात आला आहे.
खेडमध्ये आणखी 5 कोरोनाबाधीत
खेड : शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालानुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीमधील आणखी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये घरडा कॉलनीतील 3, अपेडे व आवाशीतील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. नव्या रूग्णांमुळे कोरोनाबाधीतांची संख्या 107 झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकास कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या 25 वर पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील तब्बल 204 जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत.
राजापूर शहरात कोरोनाचा शिरकाव
राजापूरः शुक्रवारी सायंकाळी राजापूर शहरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही महिला स्थानिक असून प्रवासाची कोणतीही हिस्ट्री नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्ण आढळत असताना शहर मात्र गेले 3 महिने कोरोनामुक्त होते. लॉकडाऊनचे काटेकोर पालन व तालुका व्यापारी संघाने आवश्यक त्यावेळी बाजारपेठ बंद ठेवल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र शुक्रवारी शहरातही कोरोनाने शिरकाव आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून ही महिला खासगी रूग्णालयात उपचार घेत होती. कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने राजापूर ग्रामीण रूग्णालयात तिचा स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या घरातील 11 जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. रूग्ण सापडलेला परीसर सील करण्यात आला आहे. या महिलेला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात 52 जण
या महिला रूग्णाच्या संपर्कात 52 जण आले असून त्यातील 23 जण हायरिस्क असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्वांना रायपाटण येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित 29 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती डॉ. मेस्त्राr यानी दिली.
पर्यावरण मंत्र्यांतर्फे 4 ऑक्सिजन यंत्रे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाला 4 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेशन उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता यावा यासाठी ही उपकरणे उपयुक्त ठरणार आहेत.
ही उपकरणे दिल्याबद्दल पालकमंत्री अनिल परब यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरीच्या शासकीय रूग्णालयातील सेवा सुविधांना अधिकाधिक भक्कम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याचा एक भाग म्हणून उपकरणांची सुसज्जता ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.