ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमधून चुकीचे निदान होत असल्याच्या तक्रारी राजस्थानमधून आल्याने या किटचा वापर थांबण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. त्यानंतर चीनने याची तात्काळ दखल घेत टेस्टिंग किटबाबत भारताला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
चिनी दूतावसाचे प्रवक्ते जी रोंग यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘निर्यात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांचा दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या टेस्टिंग किटमधील त्रुटी सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तसेच यासंदर्भात भारताला आवश्यक ते सहकार्य करू.’
चीनकडून मागवलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार राजस्थान सरकारने केली होती. या किटच्या माध्यमातून राजस्थानने घेतलेल्या जलद चाचण्यांमध्ये केवळ 5.4 टक्के चाचण्यांचा निष्कर्ष अचूक होता. किमान 90 टक्के चाचण्यांचे निष्कर्ष अचूक असणे अपेक्षित आहे. या किटबाबत तक्रारी केल्यानंतर आयसीएमआरने पुढील दोन दिवस या चाचण्या न करण्याचे निर्देश दिले आहेत.