पोलीस चौकशीत माहिती, दोघांना 5 दिवस पोलीस कोठडी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर पोलिसांनी गुरूवारी अटक केलेल्या `मोका’तील आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार अप्पा ऊर्फ सुभाष ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि पप्पू ऊर्फ सुहास किसन सोनवलकर (वय 24 रा. वडले, ता. फलटण जि. सातारा) यांना जिल्हा न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयितांनी मध्य प्रदेशातून पिस्तुल खरेदी केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील मोक्कातील आरोपी आप्पा मानेवर दरोडा, रॉबरी, खंडणी यासारखे 19 गंभीर गुन्हे आहेत. त्याच्यावर नवी मुंबई, कोडोली, रायगड येथे मोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याचा सहकार संशयित सुहास सोनवलकरने पोलीस वेशांतर करुन रायगड हद्दीमध्ये ज्वेलर्स फोडून 17 तोळे दागिने लंपास केले हेते. दोघांवरही मोका अंतर्गत कारवाई केली आहे. 2020 पासून दोघांच्या मागावर पुणे, सोलापूर पोलीस होते. दोघेही कोल्हापूरला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री शिवाजी विद्यापीठ परिसरात या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून दोन पिस्टल, 20 काडतुसे, तीन मॅगजीन, 3 मोबाईल, दुचाकी असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संशयितांनी चौकशीत मध्य प्रदेशातून दोन पिस्तुल खरेदी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.