आप नेते डॉमनिक गावकर यांचे कुडतरीतील लोकांना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
लोकांची केवळ फसवणूक करण्यासाठी राजकारणात आलेल्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स सारख्या खोटारडय़ा माणसांना कुडतरीतील लोकांनी थारा देऊ नये, असे आवाहन कुडतरी येथून आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवणारे डॉमनिक गावकर यांनी केले आहे. आलेक्स लॉरेन्स यांनी छोटी मोठी दुरुस्तीकामे वगळता कुडतरीतील जनतेसाठी काय केले? असा प्रश्न गावकर यांनी केला आहे.
रेजिनाल्ड यांनी कुडतरीच्या लोकांना मुर्ख बनवणे थांबवावे. काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश घेतलेल्या रेजिनाल्ड यांनी धड महिनाभर सुद्धा त्या पक्षात न राहता काँग्रेसच्या छावणीत पुन्हा सामील होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचा हा खेळ केवळ स्वार्थासाठी चालला असून सर्व पक्षांमध्ये फिरत आहेत, अशी जोरदार टीका गावकर यांनी केली आहे.
काँग्रेस सोडून दुसऱया पक्षात सामील झालेल्या लॉरेन्स यांनी आपण मतदारसंघाच्या विकासासाठी हे काम केल्याचे सांगितले. परंतु गेली 15 वर्षे आमदार असलेल्या आलेक्स यांनी या काळात मतदारसंघात कोणता विकास घडवून आणला? भाजप सरकारने त्यांना मतदारसंघात विकास करण्यापासून रोखले होते तर त्यांनी विधानसभेत सरकारविरोधात आवाज का उठवला नाही? असा सवाल गावकर यांनी केला.
कुडतरी मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राय पंचायत क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राची कमतरता आहे. शेतकऱयांना कापणी यंत्रे खरेदी करण्यासाठी 70 टक्के अनुदान उपलब्ध असूनही शेतकऱयांना ते मिळू शकत नाही. बेरोजगारी ही देखील मोठी चिंतेची बाब आहे, तरीही माजी आमदारांने ते सोडवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही,’’ असे गावकर पुढे म्हणाले.
स्वतःच्या पत्नीला भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच लोबो यांनी लॉरेन्स यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले आहे. त्यामुळे लॉरेन्स त्यांच्या छावणीत सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हे एकूण चित्र पाहता आता कुडतरीच्या लोकांनी लॉरेन्स यांच्या डावपेचांना बळी पडू नये. मतदारसंघात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आप ला संधी द्यावी, असे आवाहन गावकर यांनी आवाहन केले आहे.