लस पुर्णपणे सुरक्षित असल्याचे अधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
केंद्र व राज्य शासनेच्या सुचनेनुसार सातारा जिल्हय़ातील कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या सातारा जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड-19 चे मोफत लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणानंतर नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तो मृत्यू लसीकरणाणे न होता इतर विकाराने झाल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बु. तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी शुक्रवार दि. 16 रोजी संपत राजाराम जाधव (वय 59) यांचा कोविड-19 लसीकरणानंतर 20 मिनीटांनी डोके दुखी होऊन चक्कर आली. कोविड-19 लसीकरण अंतर्गत उद्भवणाऱया परिस्थित देण्यात येणारे औषधोपचार त्यांना तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी केले, व त्यांना तात्काळ शासकिय रूग्णवाहिकेने कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी दाखल केले, तेथे त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
यानंतर उपजिल्हा रूग्णालय कराड या ठिकाणी त्यांचे शवविच्छेदन तज्ञ समिती मार्फत करण्यात आले. शवविच्छेदनांच्या प्राथमिक अहवाला नुसार जाधव यांचा मृत्यू ‘लाईफ व्हेंट्रीकुलर हायपरथेरी अँड ऍथोरोसेलरस’ (Left Ventricular Hipertropy And Atherosclerosis) या आजाराने झाल्याचे सिध्द झाले. सदरचा मृत्यू हा कोविड-19 लसीकरणा संबंधीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक ता. कराड या ठिकाणी शुक्रवार दि. 16 एप्रिल रोजी एकूण 220 लाभार्थींना कोविड-19 चे लसीकरण करण्यात आले. यामध्ये इतर कोणत्याही लाभार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. याबाबत आरोग्य विभागाचे महिला व बाल कल्याण अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी माहीती देऊन सर्व बाबींची पडताळणी केली.
लस सुरक्षित आहे
प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक तालुका कराड येथे संपतराव जाधव यांचा झालेला मृत्यू हा कोविड-19 लसीकरणामुळे झालेला नाही. तरी 45 वर्षा वरील लाभार्थींनी लसिकरण करून घ्यावे, लस ही पुर्ण पणे सुरक्षित आहे.