बेळगाव
‘मानवतावादी सेवा देणे व माणसांच्या वेदना कमी करणे हा रेडक्रॉसचा आत्मा आहे. भारतामध्ये ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती व कोविडसारखी महामारी आल्यावर रेडक्रॉस सोसायटीने अतुलनीय काम केले आहे,’ असे विचार खासदार मंगला अंगडी यांनी व्यक्त केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त कर्नाटक राज्य शाखेकडून शिलाई मशीनचे वितरण व धान्यांचे वाटप असा संयुक्त कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खासदार अंगडी बोलत होत्या. जिल्हय़ातील 30 कुटुंबीयांना शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. हा कार्यक्रम एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ होते. याप्रसंगी ऊस व साखर विकासचे संचालक व आयुक्त शिवानंद कलकेरी व इंडियन एस.एन.एस.आय.चे संचालक डॉ. आर. बी. खंडगावी यांनी मार्गदर्शन केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे संचालक अशोक बदामी यांनी स्वागत केले. सचिव डॉ. डी. एन. मिसाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कर्नाटक राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. बी. कुलकर्णी, डॉ. व्ही. डांगी, कर्नल विनोदिनी शर्मा, खजिनदार प्रिया पुराणिक, डॉ. पवन शर्मा उपस्थित होते.