अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना करणार दुष्प्रचार
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानच्या जिल्हय़ांवर तालिबानचा कब्जा वाढत चाललेला आहे. दशतवाद्यांनी आता लष्करगाहमधील रेडिओ केंद्रावर नियंत्रण मिळविले आहे. तालिबानने स्वतःच्या धमक्या, इशारे आणि दुष्प्रचार फैलावण्याच्या उद्देशाने रेडिओ केंद्र ताब्यात घेतले आहे. प्रांतीय राजधानी लष्करगाहमध्ये तालिबान आणि अफगाण सैन्यादरम्यान मागील 5 दिवसांपासून लढाई सुरू आहे.
लष्करगाहच्या रेडिओ केंद्रावर तालिबानने कब्जा केल्याने हेलमंड प्रांतातील अफगाणिस्तानच्या सैन्याची स्थिती बिकट झाली आहे. दक्षिण हेलमंड पूर्वीच युद्धमैदान ठरले आहे. तर अमेरिकेने सोमवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यात 7 तालिबानी दहशतवादी मारले गेले.
लष्करगाहमध्ये लढाई सुरू असून सुरक्षा दल तेथे मजबूत स्थितीत आहे. तालिबानचे दहशतवादी सर्वसामान्यांच्या घरांमध्ये लपले आहेत. नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर दहशतवाद्यांनी चालविला असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. तालिबानने काजाकी जिल्हा वगळताच हेलमंडमधील 12 जिल्हय़ांवर कब्जा केला आहे. तर लष्करगाह शहरातील 10 पैकी 9 जिल्हय़ांवर दहशतवाद्यांनी नियंत्रण मिळविले आहे. लष्करगाहमधील संघर्ष तीव्र झाल्याने हेलमंडमधील सर्व प्रसारमाध्यमांचे प्रसारण थांबले आहे.