गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय : दानशूरांच्या सहकार्यातून भवन उभारणी
प्रतिनिधी/ बेळगाव
रेड्डी समाजाने उभारलेल्या भवनामध्ये गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना हे भवन सोयीस्कर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी निर्माण होत आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे भवन उपयुक्त ठरणार आहे. समाजातील अनेकांच्या देणगीतून व दानशूरांच्या सहकार्यातून हे भवन उभारले आहे. त्याचा समाजासाठी चांगला उपयोग होईल, असे विचार उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मांडले.
शनिवारी सदाशिवनगर येथील अत्याधुनिक रेड्डी भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते उद्घाटन करून बोलत होते. व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, हरिहर येथील श्री वेमनानंद स्वामीजी, माजी मंत्री एच. के. पाटील, विधान परिषद विरोधीपक्ष नेते एस. आर. पाटील, आमदार रामलिंगा रेड्डी, कर्नाटक रेड्डी जनसंघाचे संचालक डी. एन. लक्ष्मण रेड्डी, इंदिरा मळली, बेळगाव रेड्डी संघाचे अध्यक्ष रामण्णा मुळळूर, कर्नाटक रेड्डी जनसंघाचे अध्यक्ष एस. जयराम रेड्डी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रेड्डी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या अत्याधुकि भवनामध्ये 50 हून अधिक विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या भवनासाठी इंदिरा मळली यांनी कै. भीररेड्डी मळली यांच्या स्मरणार्थ सुमारे 2 कोटी किमतीची जमीन दान दिली आहे. त्यांचाही यानिमित्ताने विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले, आर्थिकदृष्टय़ा सक्षम झालेल्या रेड्डी समाजाने प्रगती केली आहे. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना हे वसतिगृह उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी आमदार अनिल बेनके, सतीश रेड्डी, ए. एस. पाटील, बसवराज बावलत्ती, बी. एन. नाडगौडा, टी. के. पाटील, राजेंद्र पाटील, व्ही. आर. मळळीगेरी, गिरीष मळली, मंजुनाथ पाटील यांसह रेड्डी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते..