प्रतिनिधी/ कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 14 वर पोहोचल्याने कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्यी 14 की 15 यावर संभ्रम असल्याने प्रशासनाकडून रेड झोन घोषितची प्रतिक्षा आहे. कोरोना रेड झोनमध्ये गेल्यास जिल्हय़ातील लॉकडाऊन वाढणार की शिथील होणार, या चर्चेला गुरूवारी दिवसभर ऊत आला.
जिल्हय़ात कोरोना तपासणीला सीपीआरमध्ये फेब्रुवारीत सुरूवात झाली. 1 मार्चपासून सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल बनले. येथील कोरोना वॉर्डमध्ये आजपर्यत 34 कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. त्यातील 30 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले, तीन प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 12 आहे. त्यापैकी चौघांना डिसचार्ज मिळाला आहे. सीपीआरमधील आंतररूग्ण विभागात आठ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक गंभीर आहे. पेठवडगाव येथील पॉझिटिव्ह रूग्ण धरल्यास ही संख्या 13 वर पोहोचली आहे. इराणहून आलेल्या अन् प्रारंभी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तरूणाचा समावेश केल्यास ही संख्या 14 वर पोहोचते. त्यामुळे आकडेवारीवरून अद्याप आरोग्य विभागात संभ्रम आहे. त्यामुळे कोल्हापूर ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये गेले आहे का, ह आता जिल्हा प्रशासन स्पष्ट करणार आहे.
राज्य शासनाकडून आरोग्य विभागाला ग्रीन, ऑरेंज, रेडसंदर्भात निश्चित अशी गाईडलाईन्स आलेली नाही. जिल्हा प्रशासनालाही यासंदर्भात अधिकृत असे पत्र आलेले नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण संख्या किती असेल तर ऑरेंज अन् किती झाल्यास रेडझोन यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच 12 की 14 पॉझिटिव्ह रूग्ण यावर गोंधळाची स्थिती आहे. कोल्हापूर कोरोनाच्या ऑरेंज झोनमध्ये आतापर्यत आहे. पण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 14 वर पोहोचल्याने रेड झोनची चर्चा सुरू झाली आहे . सीपीआरमध्ये सध्या 62 नवीन रूग्ण असून 193 रूग्ण उपचार घेत आहेत.